नाशिक : जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आज वाहतूक मार्गात बदल | पुढारी

नाशिक : जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आज वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जगन्नाथ रथयात्रेस मंगळवारी (दि. २०) सकाळी १० वाजता पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरुवात होणार आहे. ही रथयात्रा काट्या मारुती चौक, गणेशवाडी, देवी चौक, मुंजोबा चौक, आयुर्वेदिक दवाखाना, गाडगे महाराज पूल, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, काळाराम मंदिर पूर्व व उत्तर दरवाजासमोरून, ढिकले बंगला, नाग चौक, लक्ष्मण झुला पूल, काट्या मारुती चौकमार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे यात्रेचा समारोप होणार आहे. रथयात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रथयात्रा मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरून शहर पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्यानुसार रथयात्रा मार्गावरील वाहतूक मार्ग सकाळी ९ ते रथयात्रा संपेपर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहेत. तर काही मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपआयुक्त मोनिका राऊत यांनी काढली आहे. या कालावधीत पंचवटी डेपो २, तपोवन, निमाणी बसस्थानक तसेच पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या सिटी लिंकच्या बस या पंचवटी डेपोतून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठकडून शहरात येणाऱ्या बस व अन्य वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहरात ये-जा करतील. हे निर्बंध हे पोलिस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नसल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

प्रवेश बंद असलेले मार्ग

* शिवाजी चौक – सीतागुंफा रोडकडून येणारी वाहतूक बंद

* मालेगाव स्टॅण्ड

* रोकडोबा तालीम – बॅरिकेडिंग पॉइंट

* मालवीय चौक – काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक बंद

* गणेशवाडी कॉर्नर देवी चौक खुंट मंदिराजवळ – बॅरिकेडिंग पॉइंट

* संतोष टी पॉइंट – निमाणी, काट्या मारुती पोलिस चौकीकडे जाणारी वाहतूक बंद

* काट्या मारुती पोलिस चौकी – काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक बंद

* गणेशवाडी देवी मंदिर

* नेहरू चौक, दहीपूल प्रकाश सुपारी, धुमाळ पॉइंट, मंगेश मिठाई, रविवारी कारंजा – या सर्व ठिकाणी बॅरिकेडिंग पॉइंट

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

* काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडीमार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती – संतोष टी पॉइंट – द्वारका – शालिमारमार्गे इतरत्र जातील.

* दिंडोरी नाका ते होळकर पुलाकडे जाणारी वाहने – मखमलाबाद नाका, रामवाडी पूलमार्गे इतरत्र जातील.

* संतोष टी पॉइंटकडून दिंडोरी नाक्याकडे जाणारी वाहने एकेरी मार्गाने जातील.

* बुधा हलवाई – बादशाही कॉर्नरमार्गे इतरत्र.

* बादशाही कॉर्नर – गाडगे महाराज पुतळा – नेपाळी कॉर्नर, शालिमारमार्गे इतरत्र जातील.

* सांगली बँक सिग्नल – नेहरू गार्डन – नेपाळी कॉर्नर, शालिमार मार्गे इतरत्र जातील.

* रामवाडी पुलावरून अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल – शालिमार – गंगापूर रोड – सीबीएसमार्गे इतरत्र जातील.

Back to top button