नाशिक: 56 उमेदवारांचे अर्ज बाद; नाशिकरोड व्यापारी बँकेचा आज माघारीचा शेवटचा दिवस | पुढारी

नाशिक: 56 उमेदवारांचे अर्ज बाद; नाशिकरोड व्यापारी बँकेचा आज माघारीचा शेवटचा दिवस

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड – देवळाली व्यापारी सहकारी बँकेची निवडणूक येत्या 11 जून रोजी होणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे 56 इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी (दि. १ जून) शेवटचा दिवस असून, किती उमेदवार अर्ज मागे घेतात व किती रिंगणात राहतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे निवडणूक होण्यापूर्वी बँकेच्या सर्वसाधारण सभेत एक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या दोन वर्षे अगोदर बँकेत सर्वसाधारण गटासाठी दोन लाख रुपयांच्या ठेवी व वीस हजार रुपयांचे शेअर्स, तर इतर मागासवर्ग गटासह व इतर गटांसाठी एक लाख रुपयांच्या ठेवी आणि दहा हजार रुपयांचे शेअर्स घेण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. सहकारमंत्र्यांनी हा निर्णय अवैध ठरविला होता. सहकारमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात सहकार पॅनलचे नेते निवृत्ती अरिंगळे व सुनील चोपडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने जिल्हा उपनिबंधकांना शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सुमारे 56 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. जिल्हा उपनिबंधकांचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर जे इच्छुक होते व ज्यांनी प्रचारही सुरू केला होता अशा अनेक उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाल्याने या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे बुधवार (दि.31) परिवर्तन पॅनलच्या कार्यालयात दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत होता, तर सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयात मोठ्या प्रमाणात इच्छुक जमले होते. ज्या 56 इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने हेमंत दत्तात्रय गायकवाड, निवृत्ती दत्तात्रय अरिंगळे, प्रसाद आडके, संगीता गायकवाड, जगदीश गोडसे, श्याम गोहाड, विश्वास चौगुले, राजू चौधरी, बाळकृष्ण दणदणे, राजेंद्र दुसाने, योगेश निसळ, प्रकाश पाळदे, भाईजान बाटलीवाला, राजेंद्र बोथरा, केशव बोराडे आदींचा समावेश आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी (दि. १ जून) शेवटचा दिवस असून, किती उमेदवार मागे घेतात व किती रिंगणात राहतात हे तीननंतर स्पष्ट होणार आहे. सध्या सहकार पॅनल व परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहकार पॅनलचे नेतृत्व दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अशोक सातभाई, हेमंत गायकवाड, चंद्रकांत विसपुते करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button