महाबळेश्वर येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू | पुढारी

महाबळेश्वर येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर येथील वेण्णालेक फुटपाथवरील पथदिव्यांच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने एका घोड्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी घोडे मालक आयुब महामुद वारुणकर यांनी पोलीस ठाण्यात अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे.

येथील प्रसिध्द वेण्णालेक येथे उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल असून हौशी पर्यटकांची घोडे सवारीसाठी गर्दी असते. दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी सुर्यास्तानंतर घोडे व्यावसायिक आपले घोडे घेवून घरी परततात. बुधवारी सायंकाळी अश्याच प्रकारे येथील घोडे व्यावसायिक आयुब वारुणकर हे वेण्णालेक येथील फूटपाथवरुन “नागराज “ हा आपला घोडा घेऊन परतत असताना वाहनतळानजीक असलेल्या फुटपाथवरील पथदिव्याच्या लोखंडी खांबास घोड्याचा स्पर्श झाला, विजेच्या जबर धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाला, तर आयुब हे मात्र थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती आयुब यांनी अर्जाद्वारे पोलिस ठाण्यात दिली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

ऐन हंगामात उमद्या घोड्याचा अंत झाल्याने आयुब वारुणकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घोडा संघटनेचे अध्यक्ष जावेद खारकंडे यांनी या घोड्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button