नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर | पुढारी

नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी तसेच नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुष्पोत्सव २०२३’चा रविवारी (दि.२६) समारोप झाला. शेवटच्या दिवशीही नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन लाख लोकांनी तीन दिवसांत पुष्प महोत्सवाला भेट दिली. दरम्यान, हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या स्किटने पुष्पोत्सवात हास्याची लहर आली.

पुष्पोत्सवाच्या समारोपाप्रसंगी अभिनेता भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. उद्यान विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रारंभी सायक्लोन ग्रुप डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी ‘गोदा तिरी स्वच्छतेची वारी’ विषयावर पथनाट्य सादर केले. गणेशपुरे यांनी विनोदी शैलीत भाषण करून उपस्थितांना हसविले. नाशिकच्या समृद्धीत गोदावरीचा वाटा आहे. तिला स्वच्छ ठेवा. नागरिकांनीही जबाबदारीने वागून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले. चिन्मयने पुष्पोत्सवाचे कौतुक करून गोदावरी बारामाही वाहती करणे, पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करणे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे सांगितले.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने आणि सदस्यांचा, छायाचित्र स्पर्धेचे नियोजन करणारे योगेश कमोद, मनपाचे सहा उद्यान निरीक्षक, संतोष मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी, विभागीय अधिकारी मयूर पाटील, आयटी विभाग संचालक नितीन धामणे, सुरक्षा अधिकारी मधुकर शिंदे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यावेळी उपस्थित होते. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

पुष्पोत्सवाशी नाशिककरांचे घट्ट नाते

पुष्पोत्सवामुळे मनपा आणि नाशिककरांचे नाते आणखी घट्ट होणार असल्याचा सूर यावेळी उमटला. ‘पुष्पोत्सव’मध्ये विविध गटांत सुमारे ७५० प्रवेशिका आल्या होत्या. ३१ नर्सरी व ११ फूड स्टॉल होते. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपिंग ठरले. मनपा मुख्यालयातील तीनही मजल्यांवर विविध गटांची मांडणी होती. विविध पुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय आणि कॅक्टसच्या शोभिवंत कुंड्या ठेवल्या होत्या.

हेही वाचा :

Back to top button