नाशिक : गोदाघाटावर 25 हजार स्क्वेअर फुटांची महारांगोळी; आज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन | पुढारी

नाशिक : गोदाघाटावर 25 हजार स्क्वेअर फुटांची महारांगोळी; आज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महारांगोळी 200 महिलांनी एकत्रितपणे येऊन अवघ्या तीन तासांत साकारली आहे. या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वासाठी नीलेश देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भारती सोनवणे यांनी महारांगोळीप्रमुख म्हणून काम पहिले, तर मंजूषा नेरकर व सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले. सकाळी 6 ला या महारांगोळीचा पहिला बिंदू हा मेघवाळ समाजाचे समाजसेवक रामजी पाळजी मारू यांच्या सूनबाई हिरूबेन धुडा मारू व राम पला मारू, दीपाली गिते यांच्या हस्ते ठेवण्यात आला. यावेळी नववर्ष स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी, उपाध्यक्ष राजेश दरगोडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महांकाळे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दीपक भगत यांनी मेहनत घेतली.

* पंचमहाभुते व त्याचे महत्त्व प्रत्येकाला समजावे, या उद्देशाने तसेच सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’मध्ये परिवर्तन करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
* पर्यावरण आणि पंचमहाभुतांचा परस्परसंबंध दाखविणारी ही महारांगोळी आहे. रांगोळीमध्ये मधोमध पंचमहाभुतांचे बोधचिन्ह तसेच सूर्य आणि पृथ्वीदेखील साकारली आहे.
* वृक्षतोड, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहे.
* या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून वितळणारे बर्फ, पूरपरिस्थिती, दुष्काळ, पृथ्वीचे वाढलेले तापमान हे नावीन्यपूर्ण पद्धतीने रेखाटले आहेत.

प्रदर्शन दोन दिवस
पाडवा पटांगणावर दोन दिवसांकरिता महारांगोळी ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी पाडवा पटांगणावर रांगोळी पाहण्यासाठी यावे आणि कार्यक्रमांचाही आनंद घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

आज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
मंगळवारी (दि. 21) ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच मृत्युंजय दिनानिमित्त शिवकालीन शस्त्रविद्या व भारतीय व्यायाम पद्धती यांची प्रात्यक्षिके सायंकाळी 6 ला सादर केली जाणार आहेत. तसेच शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी यासाठी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत राहणार आहे. प्रात्यक्षिके सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव आणि त्यांचे विद्यार्थी दाखवणार आहेत.

Back to top button