Dhule Gram Panchayat : शिरपूरमध्ये सर्व 16 जागांवर भाजपाचे सरपंच, महाविकास आघाडीचा धुव्वा | पुढारी

Dhule Gram Panchayat : शिरपूरमध्ये सर्व 16 जागांवर भाजपाचे सरपंच, महाविकास आघाडीचा धुव्वा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या तालुक्यातील सर्व 16 ग्रामपंचायतीत सरपंच पदावर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवला आहे. तसेच यापूर्वी एका जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बिनविरोध झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील सतरा ग्रामपंचायत यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांचे यापूर्वी देखील वर्चस्व होते. त्यामुळे सर्व 17 जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार असल्याचे चित्र होते. काही ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार असल्याचे चित्र होते. परंतु प्रत्यक्ष निकाल मात्र भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे. शिरपूर तालुक्यातील खर्दे पाथर्डी येथून सुशीला काशिनाथ भिल, वरझडी येथून दिलीप पावरा, वाघाडी येथून किशोर माळी, तरहाड कसबे येथून महेश अरुण सावळे, हाडाखेड येथून सुरेश पावरा, खंबाळे येथून सतीबाई पावरा, महादेव दोंदवाडा येथून संगीता पावरा, थाळनेर येथून मेधा पाटील, मांजरोद येथुन गोजरबाई भिल, अजंदे बुद्रुक येथून तुळसाबाई भिल, अजनाळे येथून दरबार जाधव, हिसाळे येथून उत्तम पावरा, तोंडे येथून राहुल चौधरी, करवंद येथून हिरामण भिल, अर्थे बुद्रुक येथून मनीषा पाटील, आर्थे खुर्द येथून वंदना दीपक गुजर हे सर्व भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

या ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. दरम्यान विजयी उमेदवारांचे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा तसेच प्रभाकर चव्हाण, राजगोपाल भंडारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला आहे.

Back to top button