धुळे: आग दुर्घटनेतील कुटुंबीयांना मदत मिळवून देणार : मंजुळा गावित | पुढारी

धुळे: आग दुर्घटनेतील कुटुंबीयांना मदत मिळवून देणार : मंजुळा गावित

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : येथील कुंभार गल्लीत लागलेल्या आगीत सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबियांना शासकीय स्तरावरून मदत मिळावी, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी दिले.

पिंपळनेर येथील कुंभार गल्लीत सोमवारी मध्यरात्री अचानक लाग लागली. यावेळी झोपेत असलेले कुटुंब जागे झाल्याने ते वेळेवरच सुखरुप घराबाहेर पडले. कुंभार गल्लीतील नागरिकांनी आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने बाळू सोनवणे, मिनाबाई सोनवणे, दिलीप बागूल, धोंडू बागूल, जिभाऊ बागूल, रमेश बागूल यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत बागूल परिवारातील आणि सोनवणे कुटुंबाचे संसार उघड्यावर आला आहे. आगीत नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी आमदार गावित नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी सरपंच देविदास सोनवणे, सपोनि सचिन साळुंखे, ज्ञानेश्वर एखंडे, महेश पाटील, अविनाश पाटील, कैलास सुर्यवंशी, नितीन कोतकर, देवेंद्र कोठावदे, निलेश कोठावदे आदीसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पिंपळनेर शहराचा विस्तार वाढल्याने एक अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील आमदार गावित यांनी यावेळी दिले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ऐन दिवाळीच्या सणात पिंपळनेर येथील कुंभार गल्लीत सोमवारी मध्यरात्री एकापाठोपाठ सहा घरांना लाग लागली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. या घटनेमुळे गल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button