Dhule : नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी; दोघांना अटक | पुढारी

Dhule : नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी; दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी करणाऱ्या दोघांना उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून टँकर सह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ट्रक मधून विजेचा पंप आणि पाईप आढळून आला असून हा डिझेलचा साठा बेकायदेशीरपणे उतरवला जाणार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सागर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक पंजाबराव साळुंखे तसेच प्रवीण पाटील, किशोर खैरनार, मुकेश पवार आदींच्या मदतीने या टँकरचा महामार्गावर शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी धुळे तालुक्यातील अजंग शिवारात असणाऱ्या हॉटेल एकता समोर जी. जे 21 टी. 5943 क्रमांकाचा हा टँकर आढळून आला. या टँकरची तपासणी केली असता यात बायोडिझेलचा साठा असल्याचे स्पष्ट झाले.

या संदर्भात चालकाकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने या बायोडिझेलची तस्करी होत असल्याची बाब प्राथमिक तपासात निदर्शनास आली. त्यामुळे पोलीस पथकाने टँकरचा चालक गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात राहणारा सुरजीतसिंग चुनीलाल वसावा आणि सुरत जिल्ह्यातील साहिल अब्दुल कादिर हाफिजजी यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांसह बायोडिझेलचा पुरवठा करणारा व्यापारी आणि बायोडिझेलचा पुरवठा ज्याच्याकडे होणार होता अशांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button