एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे बॅनर फाडले, धुळ्यात शिवसेनेत फूट | पुढारी

एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे बॅनर फाडले, धुळ्यात शिवसेनेत फूट

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेबरोबर बंड करणाऱ्या राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे बॅनर धुळ्यात लागल्याने धुळे जिल्हा शिवसेनेत देखील दोन गट तयार होण्याचे संकेत मिळाले आहेत. शहरभरात चार ठिकाणी लावण्यात आलेले हे बॅनर शिवसेनेच्या एका गटाने फाडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉक्टर तुळशीराम गावित हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना त्यांनी शिंदे गट जवळ केला आहे आता महानगर प्रमुख सतीश महाले यांनी देखील शिंदे गटाचे समर्थक बॅनर लावल्याने धुळे जिल्हा शिवसेनेत दोन उघड गट तयार झाले आहेत.

राज्यात होत असलेल्या राजकीय वादळाचे लोण धुळ्यात येऊन पोहोचले आहेत. धुळे शहरातील चार ठिकाणांवर शिवसेनेचे विद्यमान महानगरप्रमुख सतीश महाले यांनी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे समर्थन करणारे बॅनर लावले. या बॅनरवर हिंदुत्ववादी शिवसेना असा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान हे बॅनर लावण्यात आल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाल्याने शहरातील बारा पत्थर चौकात शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, महानगर प्रमुख मनोज मोरे, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, राजेश पटवारी, भरत मोरे, विनोद जगताप, संदीप सूर्यवंशी, कुणाल कानकाटे, यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी हे बॅनर फाडले.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना शिवसैनिकांनी आपण शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे बॅनर लावणारे महानगरप्रमुख सतीश महाले यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे धुळे जिल्हा शिवसेनेत उभी फूट पडणार असल्याचे चिन्ह दिसून आले आहे. दरम्यान यापूर्वी साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यांचे पती डॉक्टर तुळशीराम गावित हे धुळ्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने ते देखील शिंदे गटास जाऊन मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धुळ्याचे जिल्हाप्रमुख आणि एक महानगरप्रमुख हे शिंदे गटाचे समर्थक असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसेनेत आता दोन गट तयार झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

हेही वाचा :

Back to top button