मालेगाव : शरद पवारांच्या छायाचित्रावरील पोस्ट एपीआयच्या अंगलट, राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर माफीनामा व्हायरल | पुढारी

मालेगाव : शरद पवारांच्या छायाचित्रावरील पोस्ट एपीआयच्या अंगलट, राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर माफीनामा व्हायरल

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
वादग्रस्त पोस्टप्रकरणी देशभरात द्वेषाचे राजकारण होऊन अनेकांना पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागत असल्याची मालिका सुरू असताना सहायक पोलिस निरीक्षकालाच एक पोस्ट अंगलट आली आहे. वर्गमित्रांच्या एका गृपवर शरद पवार यांच्या छायाचित्राखाली केलेली वादग्रस्त कमेंट वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ रात्री उशिरा ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्याने माफीनामा व्हायरल केला, परंतु, या प्रकरणाची चौकशी करावी, तोपर्यंत या अधिकाऱ्याचे निलंबन करावे असा अल्टिमेटम देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते माघारी गेले.

आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगाव समन्वयक शकिलजानी बेग यांनी सांगितले की, धुळे येथील एका सोशल मीडिया गृपवर किल्ला पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्याची माहिती त्यांना मुंबई कार्यालयाकडून प्राप्त झाली. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी यासाठी आजी माजी नगरसेवक यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रात्री निदर्शन केलीत. पोलिस उपाधिक्षक जाधव यांनी योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले असले तरी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आज शुक्रवार सकाळी ११ वाजता अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेतली जाणार आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने माफीनामा जाहीर केला असून त्यात एकूणच हकीकत मांडली आहे.

काय आहे प्रकरण ?

‘बालमित्र १९९९’ या गृपवर एका मित्राने टाकलेल्या राजकीय जोकच्या पोस्टवर विनोदाने ‘वसुली भाई’ अशी कमेंट पास झाली. विनोदाचा भाग असला तरी एका सदस्याने तो स्क्रीनशॉट इतर गृपवर पाठविला. तो व्हायरल झाला.

त्यानंतर, त्यात वैयक्तिक टीपण्णी करण्याचा उद्देश नव्हता. परंतु कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी करावी, त्या पोस्टचा विपर्यास करु नये अशा आशयाचा मजकूर व्हायरल झाला आहे. आता या विषयावर काय कारवाई आणि प्रतिक्रिया उमटतात, हे आज दिसून येईल.

हेही वाचा :

Back to top button