नाशिक : शाळांची घंटा घणाणली, कसा होता पहिला दिवस ? | पुढारी

नाशिक : शाळांची घंटा घणाणली, कसा होता पहिला दिवस ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह उपनगरांमधील शाळांची पहिली घंटा बुधवारी (दि.15) घणाणली. कोरोनाच्या सावटामुळे शाळा व्यवस्थापनाने आवश्यक खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. काही शाळांमध्ये गुलाबपुष्पासह चॉकलेट व बिस्किट्स देऊन, तर काही शाळांमध्ये औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्येही उत्साह दिसून आला.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सोमवार (दि.13)पासून प्रारंभ झाला असला तरी, विद्यार्थ्यांना दोन दिवसांनंतर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश देण्यात आला. राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानातर्फे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी नव्याकोर्‍या पुस्तकांसह नवे मित्र-मैत्रिणी आणि जुन्या मित्रांची भेट झाल्याने शाळेच्या परिसरात किलबिलाट बघावयास मिळाला. तर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी चिमुकल्यांचे स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली.

शाळा सुरू करण्यापूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संपूर्ण आवाराचे रंगरूप पालटले आहे. असंख्य शाळा नव्या रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. तर शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांच्या प्रवेशाद्वार तसेच वर्गखोल्यांबाहेर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, पहिल्या दिवशी शाळेत दैनंदिन परिपाठ घेण्यात आला. तसेच शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांना ‘ऑफलाइन’ धडे मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. त्या तुलनेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये कमी उत्साह होता.

पालकांची गर्दी 

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी केली होती. काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. शाळेच्या मधल्या सुटीत विद्यार्थ्यांनी एकत्र जेवणाचा आनंद लुटला.

‘मराठा’मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

मविप्र संस्था संचलित मराठा हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2022 -23 च्या पहिल्याच दिवशी अतिशय उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या. व्यासपीठावर शालेय समितीचे सदस्य उत्तम मुळाणे, माणिक ठुबे, अनिल सोनवणे, अशोक जाधव, सुमन बागले, शैलजा कारे, उपमुख्याध्यापक संजय डेर्ले, पर्यवेक्षक शरद शेजवळ आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाच्या उपप्रमुख अर्चना गाजरे व सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button