नाशिक : ‘सिटीलिंक’च्या पासकेंद्रांचे जाळे विस्तारणार | पुढारी

नाशिक : ‘सिटीलिंक’च्या पासकेंद्रांचे जाळे विस्तारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेला नाशिककरांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पासकेंद्रांचे जाळे विस्तारण्याचा निर्णय सिटीलिंकने घेतला आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या तीन केंद्रांसह शहरात नवी 14 पासकेंद्रे टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सिटीलिंकने प्रवास करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.

विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये, यासाठी सिटीलिंकने सिटीलिंक कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय व तपोवन आगारासह शहरात नवीन बस पासकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थात 13 जूनपासून भुजबळ नॉलेज सिटी, केटीएचएम, एचपीटी महाविद्यालय याठिकाणी पासकेंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात अर्थात 1 ऑगस्टपासून मनपा सिडको कार्यालय, मनपा सातपूर कार्यालय, के. के. वाघ महाविद्यालय, बिटको महाविद्यालय, निमाणी व नाशिकरोड बसस्थानक, मनपा उपविभागीय कार्यालय अशोकनगर, के. बी. टी. इंजिनिअरिंग महाविद्यालय, सिटीलिंक कार्यालय, गुरू गोविंद सिंग महाविद्यालय येथे पासकेंद्रे सुरू होतील.

पासचे ऑनलाइन नूतनीकरण
ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पासेस काढायचे आहेत त्यांना कागदपत्रे सिटीलिंक मुख्य कार्यालयातून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहेत. त्यानंतरच विद्यार्थी प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता टप्प्याटप्प्याने पासकेंद्रे सुरू केली जाणार आहेत. विद्यार्थी कोणत्याही केंद्रावरून पास काढू शकतात. नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर जाण्याची गरज नाही. सिटीलिंकच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवरून पासचे ऑनलाइन नूतनीकरण करता येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button