नाशिक : तीन महिने उलटूनही जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त अपूर्णच | पुढारी

नाशिक : तीन महिने उलटूनही जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त अपूर्णच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 28 फेब्रुवारीस होऊनही त्याचे इतिवृत्त अजूनही पूर्ण झाले नाही. तसेच त्यानंतर मार्चमध्ये झालेल्या स्थायी समितीचेही इतिवृत्त अपूर्ण असल्यामुळे त्या सभेने मंजुरी दिलेली कामे अडकून पडली आहेत. मात्र, प्रशासनाकडून प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून इतिवृत्त अंतिम करणे का टाळले जात आहे, असा प्रश्न लोकप्रतिनिधींनाही पडला आहे.

जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेच्या विषयपत्रिकेमध्ये सभेचे इतिवृत्त वाचन करून ते अंतिम करणे असा मुद्दा असतो. मात्र, त्याच सभेत इतिवृत्त लिहिणे व्यावहारिक नसल्यामुळे किमान पुढच्या सभेपूर्वी सर्व सदस्यांना इतिवृत्त पाठवण्याची पद्धत आहे. म्हणजेच पुढच्या सभेपूर्वी तरी इतिवृत्त पूर्ण होणे अपेक्षित असते. त्या सभेनंतर 20 मार्चपासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. सर्वसाधारण सभांमधील अंतर तीन महिन्यांपेक्षा कमी असले पाहिजे, या नियमानुसार मेमध्ये सर्वसाधारण सभा झाली. तरीही इतिवृत्त अपूर्णच आहे.

आमदारांनी खडसावले
स्थायी समिती सभा प्रत्येक महिन्याला होत असते. त्यामुळे त्या सभेचे इतिवृत्त महिन्याच्या आत पूर्ण करणे अपेक्षित असताना दोन महिने उलटूनही मार्चच्या सभेचे इतिवृत्त अद्यापही अपूर्णच आहे. अखेरच्या सभेमध्ये सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील यात्रास्थळाच्या कामातील बदलास मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्या सभेचे इतिवृत्त अंतिम झाले नसल्यामुळे ते काम रखडले आहे. अखेर आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा परिषदेत येऊन प्रशासनाला खडसावल्याचे समजते. त्यानंतर हालचालींना वेग आला आहे.

या जिल्हा परिषद सदस्यांच्या सभेचे हे अखेरचे इतिवृत्त असल्याने त्यात काहीही त्रुटी राहू नये. तसेच 15 व्या वित्त आयोगाच्या रकमांच्या आकड्यांमध्ये दुरुस्ती असल्यामुळे इतिवृत्त अंतिम होण्यास उशीर झाला आहे. – आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

हेही वाचा:

Back to top button