नाशिक : कोरोना रुग्णांच्या माहिती प्रकरणी खासगी लॅबला मनपाची नोटीस | पुढारी

नाशिक : कोरोना रुग्णांच्या माहिती प्रकरणी खासगी लॅबला मनपाची नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई येथील एका खासगी लॅबने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पॉझिटिव्ह आलेल्या एकाच कुटुंबातील चौघा रुग्णांचे अहवाल कोरोना पोर्टलवर मंगळवारी (दि.31) टाकले. त्यामुळे शहरात एकाच दिवशी पाच रुग्णवाढ आढळून आल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या चौकशीत उघड झाली. या प्रकारामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने संबंधित खासगी लॅबला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शहरात लसीकरण आधिक झाल्याने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला थोपविण्यात नाशिक महापालिकेला यश आले. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कोेरोना रुग्णांची संख्या रोखण्यातही महापालिकेला यश आले असून, वैद्यकीय विभागाकडून सतर्कता पाळली जात आहे. मात्र, मंगळवारी (दि. 31) शहरात कोरोनाचे अचानक पाच रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय विभागातील अधिकार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली. त्यात काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह इतरही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळून येत असल्याने नाशिकमध्येही रुग्णवाढ सुरू झाली की काय, अशी शंका निर्माण झाली. याबाबत वैद्यकीय विभागाने पाच रुग्णांची माहिती घेतली असता पाचपैकी चार कोेरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गेल्या वर्षी एप्रिलमधील असल्याचे समोर आले. मुंबईस्थित जनरल डायग्नोस्टिक लॅबने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या चौघांचेही अहवाल कोरोनाच्या आयसीएमआर पोर्टलवर मंगळवारी (दि.31) अपलोड केले. त्यामुळेच रुग्णवाढ दिसून आली. याबाबत वैद्यकीय विभागाने केलेल्या चौकशीत संबंधित लॅबने गेल्या वर्षी संबंधित रुग्ण आयसीएमआरवर अपलोड करण्याऐवजी 31 मे 2022 रोजी अपलोड केल्याचे समोर आले. त्यामुळे वैद्यकीय विभागाने लॅबला नोटीस दिली.

हेही वाचा :

Back to top button