नाशिक : सिन्नर शहरात मोबाइल टॉवरला नागरिकांचा विरोध | पुढारी

नाशिक : सिन्नर शहरात मोबाइल टॉवरला नागरिकांचा विरोध

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील शिवाजीनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एका घरावर होत असलेल्या जिओ कंपनीच्या टॉवरला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत त्यांनी नगर परिषदेला निवेदन देत टॉवर हटवण्याची मागणी केली आहे.

शिवाजीनगर परिसरात होणार्‍या टॉवरचे काम 24 मार्च 2021 रोजी सुरू करण्यात आले होते. तेव्हा परिसरातील नागरिकांनी तीव्र आंदोलन करत टॉवरचे काम बंद पाडले होते. तेव्हाही नगर परिषदेला निवेदन देत टॉवर हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार नगर परिषदेने यावर बंदी घातली होती. मात्र, नगर परिषदेचे कुठलीही परवानगी नसताना जिओ कंपनी व ठेकेदाराकडून मनमानी करून या टॉवरची उभारणी करत आहे. टॉवरच्या रेडिएशनमुळे वयस्कर लोकांना हदयविकाराचा त्रास, लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम, पावसाळ्यात वीज पडण्याची शक्यता असते. तसेच मोबाइल टॉवरपासून 1 किमी अंतरावर राहणार्‍या नागरिकांना डोकेदुखी, हदयरोगाची समस्या, नैराश्य, प्रजनन क्षमतेच्या समस्या उद्भवू शकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कंपनीचे ठेकेदार नगर परिषदेच्या आदेशाला जुमानत नसून, मनमानी व दादागिरी करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी नगर परिषदेला निवेदन देत टॉवरचे काम बंद न केल्यास 1 जूनपासून नगर परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी नागरिकांकडून नगर परिषद प्रशासन व ठेकेदाराविरुद्ध कोर्टात दाद मागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शहरातील टॉवरची चौकशी करा
शहरातील उपनगरांत सध्या शेकडो टॉवरची उभारणी करण्यात आली असून हे टॉवर उभे करताना परवानगी घेऊन उभारले आहे की नाही? याचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनात केली आहे.

हेही वाचा :

Back to top button