शेतजमीन खरेदी फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या : दोघांवर गुन्हा | पुढारी

शेतजमीन खरेदी फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या : दोघांवर गुन्हा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगाव येथील शेतजमीन खरेदी त फसवणूक करून अवैध सावकारीच्या जाचातून अवाजवी वसुली केल्यामुळे एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली होती. शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणातील दोघांविरोधात जळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुकलाल लक्ष्मण घोडके (वय ४५, नागसेन नगर) यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेल्या फेब्रुवारीत सुकलालने लिहिलेली सुसाइड नोट त्याच्या पत्नीस मिळाली. या सुसाईड नोटच्या आधारावर रविवारी (दि.९) रोजी सुकलालच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा सावकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सुकलाल घोडके यांच्या आईच्या नावावर धानवड येथे २ हेक्टर ३२ आर क्षेत्रफळ असलेली जमीन आहे. ५ एप्रिल २०१८ रोजी ही जमीन खरेदी करण्यासाठी दलाल प्रकाश सुपडू माळी यांनी घोडके कुटुंबियांना संपर्क केला. त्यानुसार शैलेंद्र वसंत चिरमाडे हे जमीन खरेदी करण्यास तयार झाले.

ही जमीन ५ लाख ७५ हजार रुपयांत खरेदी करण्याचे ठरले. त्यानुसार सौदा पावती करण्यात आली. सुरूवातीला २ लाख रुपये द्यायचे व उर्वरीत ३ लाख ७५ हजार रुपये जमीन खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले होते.

दरम्यान, चिरमाडे व माळी यांनी काही दिवसांनी घोडके यांच्या आईस केवळ ५० हजार रुपये दिले. जमीन खरेदीसाठी शासनाच्या परवानगीची गरज आहे. परवानगी घेण्यासाठी खर्च येणार असून तो आम्ही करु. झालेला खर्च मूळ रक्कमेतून कमी करुन तुम्हाला देऊ असे दोघांनी सांगितले.

परंतु, सौदा पावती करताना अशी कोणतीही अट घातलेली नव्हती. यानंतर माळी व चिरमाडे यांनी जमीन खरेदीसाठी घोडके यांच्याकडे तगादा लावला. जमीन लवकर खरेदी करुन द्या, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवून टाकू अशा धमक्या दोघांनी घोडके यांना दिल्या.

माळी आणि चिरमाडे यांनी दिलेल्या धमक्यांमुळे घोडके तणावात राहत होते. त्यांनी पत्नी शोभा व मुलगा हर्षल यांना देखील ही बाब सांगितली होती. दोघांचा त्रास वाढल्यानंतर घोडके यांनी आत्महत्या केली.

सुसाइड नोट सापडली

यानंतर फेब्रुवारीत त्यांच्या पत्नी शोभा यांनी घराची सफाई केली असता घोडके यांच्या शर्टच्या खिशातून एक सुसाइड नोट मिळून आली. यात त्यांनी याबाबतची माहिती लिहून ठेवली आहे.

दरम्यान, घोडके यांच्या वडीलांचे सन २०१६ मध्ये निधन झाले आहे. यावेळी त्यांनी माळी याच्यांकडून व्याजाने १० हजार रुपये घेतले होते. वेळेत पैसे न देऊ शकल्यामुळे त्याने घोडकेंकडून तब्बल सव्वा लाख रुपये उकळले आहेत. असाही उल्लेख दाखल फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

या संदर्भात शोभा घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चिरमाडे व माळी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला नशिराबाद येथून अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरारी असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button