शाळा स्तरावरच संशोधन व्हावे : इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर | पुढारी

शाळा स्तरावरच संशोधन व्हावे : इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा  हर्षद ठाकूर :  सध्याच्या घडीला भारतीय मार्केट जास्तीत जास्त परदेशी कंपन्यांनी व्यापले आहे.

त्यातही महत्त्वाचे म्हणजे चिनी कंपन्यांनी सर्वाधिक भारतीय मार्केटवर कब्जा केला आहे. हे सर्व संशोधनामुळे शक्य होत आहे.

त्यामुळे आपल्या देशातही चिनी लोकांप्रमाणे छोट्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी व अन्य वस्तूंचे इनोव्हेशन व्हायला हवे.

त्याची सुरुवात शाळांपासून झाली, तर खूपच चांगले आहे.

त्याकरिता शाळास्तरावर प्रयत्न करायला हवेत, असे मत इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर यांनी व्यक्त केले.

संजय घोडावत प्रस्तुत आणि दै. ’पुढारी’ आयोजित ’एज्यु-दिशा’ या लाइव्ह वेबिनार कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

या वेळी त्यांनी ’अभियांत्रिकीमधील नवकल्पना’ या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. दत्ता पाटील यांनी केले.

ठाकूर म्हणाले की, भारतामध्ये कल्पकपणा, अभियांत्रिकीचे ज्ञान यांची कमतरता नाही.

पण, तरीही या बाहेरील कंपन्या भारतीय मार्केटवर कब्जा कसा करतात, हा मोठा प्रश्न आहे.

उदाहरणार्थ, आपल्या देशात दरवर्षी सुमारे साडेबारा हजार कोटींची खेळणी विकली जातात.

यातला 75 टक्के भाग परदेशातून आयात केला जातो.

या आयातीमध्ये चीनचा सर्वाधिक सहभाग असल्याचे दिसून येते.

त्यामुळे आपल्या देशात पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारित सर्व खेळण्यांचे प्रमाण जास्त आहे.

भारतीय संस्कृतीवर आधारित खेळणी कुठे आहेत?

भविष्यात हे रोखण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करून शाळांमधूनच संशोधक निर्माण करायला हवेत.

संशोधनासाठी शाळांना अर्थसाहाय्य

भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेकडून (एआयटीसी) शाळांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ’अटल टिंकरिंग लॅब’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी शासन प्रत्येक शाळेला लॅब उभारण्याकरिता अर्थसाहाय्य आणि अन्य लागणारी सर्व मदत करीत आहे.

त्याचा लाभ शाळांनी नक्कीच घ्यायला हवा, असेही ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

Back to top button