पिंपळनेर : विरखेल-धामंदर लघु प्रकल्पाबाबत शेतक-यांचे आ. गावित यांना निवेदन | पुढारी

पिंपळनेर : विरखेल-धामंदर लघु प्रकल्पाबाबत शेतक-यांचे आ. गावित यांना निवेदन

पिंपळनेर(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील विरखेल-धामंदर येथील लघु प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढवण्यात यावी. तसेच येथील पात्रात साचलेला गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यात यावी. तसेच यासंदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न त्वरीत सोडवावा. अशा आदी मागण्यांबाबतचे निवेदन शेतक-यांनी आमदार मंजुळा गावित यांना दिले.
विरखेल-धामंदर येथील लघु प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढविण्यासह प्रवेशव्दाराची दुरुस्ती, बंधा-याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यामुळे विरखेल-धामंदर, कोकणगाव, शेवगे, वंजारतांडा, बल्हाणे, देशशिरवाडे, सितारामपूर येथील शेती धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धरण व सांडव्याची उंची वाढवून त्यांची खोलीकरण करणे तसेच धरणाच्या दरवाजांची दुरुस्ती करणे यासाठी गावातील शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांना निवेदन देऊन तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली आहे. सांडव्याची कमी उंची व धरणात गाळ साचलेला आहे. तसेच पावसाळ्यात येथे मुबलक प्रमाणात पाणी जिरत नसल्याने विहिरीची पाणी पातळी सुद्धा खालावली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या तडाख्याने शेतक-यांना कांद्याचे पीक सोडून द्यावे लागले आहे. त्यामुळे धरणाचे काम तातडीने करण्याची विनंती धरण क्षेत्राखाली येणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी ताराचंद भोगे, नानाजी मोरे, सीमा सोनवणे, नानासाहेब भदाणे, विजय बागुल, संजय भवाणे, नीलेश पगारे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button