नाशिक : लाडक्या बाप्पाचरणी हजारो भक्त लीन | पुढारी

नाशिक : लाडक्या बाप्पाचरणी हजारो भक्त लीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ॐ गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धिविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
टाळ-मृदंगाचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया; जय गणेशच्या जयघोषात मंगळवारी (दि.19) अंगारकी संकष्ट चतुर्थी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने हजारो गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी लीन झाले.

कोरोना निर्बंधमुक्त व यंदाच्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेशभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. शहरातील गणेश मंदिरांत फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. लाडक्या बाप्पा चरणी लीन होण्यासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्रींची महाभिषेक व महाआरती पार पडली.

गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिरातदेखील दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या. यावेळी भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीतर्फे विशेष नियोजन करण्यात आले.

याशिवाय अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपती, उपनगरचे इच्छामणी, जुन्या नाशिकमधील मोदकेश्वर यासह शहरातील अन्य गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी साजरी करण्यात आली. दरम्यान, चालू वर्षात 13 सप्टेंबरला अंगारकी चतुर्थीचा योग पुन्हा जुळून येणार आहे.

(सर्व फोटो- हेमंत घोरपडे)

हेही वाचा :

Back to top button