नाशिक : रामकुंडावरील गांधी तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्‍यु | पुढारी

नाशिक : रामकुंडावरील गांधी तलावात १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्‍यु

पंचवटी(जि.नाशिक), पुढारी वृत्तसेवा : रामकुंडातील गांधी तलाव येथे पोहण्यासाठी तीन लहान मुले गेली होती. पोहताना ते तिघेही बुडाल्याची घटना रविवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास घडली. यात १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला असून, जीवरक्षकांच्या प्रसंगावधनामुळे अन्य दोघांचा जीव वाचला आहे. हसनेन उमर शेख (रा. विधातेमळा, मुंबई नाका) असे मृत मुलाचे नाव आहे. तर सुनील विनोद परदेशी (१५, रा. कालिका नगर, मुंबई नाका) याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, मुंबई नाक्याजवळील कालिका नगरमधील हसनेन, सुनील आणि त्यांचा एक मित्र असे तिघे जण रविवारी सायंकाळी चार ते साडे चारच्या सुमारास रामकुंडावर पोाहण्यासाठी आले होते. गांधी तलावात पोहताना तिघांना दम लागल्याने ते बुडू लागल्याचे जीवरक्षकांच्या लक्षात आले. यावेळी काही जीवरक्षकांनी पाण्यात उड्या घेत दोघांना वाचविले. मात्र, हसनेन पाण्यात बुडाल्याने त्याला वाचविता आले नाही. काही वेळाने हसनेनचा शोध लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व डॉ. बोरा यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ऐन रमजानसारख्या सणाच्या काळात या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. तर तिसऱ्या मुलाचे नाव समजू शकले नाही.

दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत जीवरक्षक दलाच्या तरुणांनी बुडालेल्या मुलांना बाहेर काढले होते. यावेळी रामकुंडावरील अमित धारगे, दीपक जगताप, सुनील बोरसे, शंकर माळी, शिवा बोरसे, शिवा वाघमारे, गणेश भोंड, सुरज, सोपान आदी जीवरक्षक मुलांना वाचविण्यासाठी धाव घेतली.

 

Back to top button