रंगपंचमीला ‘हे’ अजिबात करु नका ; मंगलरुप गोशाळेची रंगप्रेमींना साद | पुढारी

रंगपंचमीला 'हे' अजिबात करु नका ; मंगलरुप गोशाळेची रंगप्रेमींना साद

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

आपली गम्मत आणि मज्जा म्हणून अबोल प्राण्यांवर रंग उधळू नका, या रासायनिक रंगांमुळे त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते, ही जाणीव ठेवा, अशी साद शहरातील मंगलरूप गोशाळेने रंगप्रेमींना घातली आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर या गोशाळेने गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर हा संदेश व्हायरल केला आहे.

रंगपंचमी, धुळवड साजरी करत असताना अनेकदा गम्मत म्हणून कुत्री, मांजर, गायी, शेळ्या अशा भटक्या अबोल प्राण्यांवर विविध रासायनिक रंग फेकले जातात. एकदा की त्यांच्या अंगावर हे रंग पडले की ते चाटतात आणि हे रासायनिक रंग पोटात गेल्यानंतर त्यांना पचनक्रियेसाठी त्रास होऊ लागतो. रंगामधील घातक असे रासायनिक घटक केवळ माणसांनाच नव्हे, तर अबोल प्राण्यांनाही घातक ठरतात. यातून त्यांना गंभीर आजारदेखील होऊ शकता.

रंगपंचमीच्या दोन-तीन दिवसांनंतर अशा बऱ्याच केसेस येत असतात, अशी माहिती गोशाळेचे संचालक व प्राणिप्रेमी पुरुषोत्तम आव्हाड यांनी दिली. प्राण्यांच्या केसांना लागलेले रंग हे पटकन निघत नाहीत. रंगातील मर्क्युरी नावाचा घटक घातक असून, त्यामुळे त्वचेची ॲलर्जी तसेच कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यांच्यावर पाणी फेकल्याने त्यांना सर्दीदेखील होते. नागरिकांमध्ये याबाबत चांगली जनजागृती होणे अधिक गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन आव्हाड व त्यांच्या ग्रुपने ही जनजागृती मोहीम राबविली आहे. नागरिकांनी खरोखर प्राण्यांवर रंग टाकू नये.

रंगप्रेमींची काही वेळेपुरती गंमत निष्पाप प्राण्यांच्या जीवावर बेतू शकते, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. रंगांमुळे प्राण्यांना काही इजा पोहोचू नये तसेच कुठला आघात होऊ नये याची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. रंगांमुळे जखमी झालेले असे काही प्राणी आढळल्यास मंगलरूप गोशाळेशी (9028175817, 9922063232) संपर्क साधावा.

– पुरुषोत्तम आव्हाड, मंगलरूप

हेही वाचा :

Back to top button