नाशिक : हिरावाडी शिवजन्मोत्सव देखाव्याची ‘इंटरनॅशनल जिनियस बुक’ने घेतली नोंद | पुढारी

नाशिक : हिरावाडी शिवजन्मोत्सव देखाव्याची 'इंटरनॅशनल जिनियस बुक'ने घेतली नोंद

पंचवटी (नाशिक) पुढारी वृत्तसेवा : हिरावाडी शिवजयंती यात्रोत्सव समितीने यंदा साकारलेल्या अप्रतिम देखाव्याची नोंद इंटरनॅशनल जिनियस बुक’ने घेतली असून हा देखावा विश्वविक्रमी ठरला आहे. धार्मिकदृष्ट्या ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीने शिवजन्मोत्सव देखाव्यात सलग दोन वर्षे विक्रम नोंदवून पंचवटीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नाशिक येथील हिरावाडी शिवजयंती यात्रोत्सव समितीने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय यात्रोत्सवात वास्तुशिल्प आर्ट स्टुडिओचे कलाकार आनंद सोनवणे आणि विवेक सोनवणे यांनी नऊ मंदिरांचा समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुहेचे सर्वात मोठे शिल्प साकारले. यामध्ये छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे, माँ साहेब जिजाऊ, पंढरपूरचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा, आई तुळजाभवानी, गंगा गोदावरी, कपालेश्वर, केवडीबनचा म्हसोबा अशा नऊ मंदिरांचा समावेश होता. गुहेभोवती खळाळणारी गोदावरी नदी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पुढे नदीकिनारी साकारलेल्या शिवलिंगाने कपालेश्वराचे तर छोट्याशा धबधब्याजवळ पंचवटीतील ग्रामदैवत केवडीबनच्या म्हसोबाचे दर्शन घडले. एकूणच, धार्मिकदृष्ट्या ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीतील आराध्यदैवतांचे दर्शन या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला होता.

70 फूट उंच, 60 फूट रुंद आणि 60 फूट लांब असलेले हे भव्य शिल्प व कलाकृती या कलाकारांनी अवघ्या 10 दिवसांत साकारली. यासाठी स्टील, लाकूड आणि फायबरचा वापर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित विविध गुणांचे प्रतिनिधित्व करणारे हे सर्वात मोठे गुहा शिल्प अर्थात ‘शिवतीर्थ लेणी’ या कलाकृतीची नोंद इंटरनॅशनल जिनियस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

नाशिक : कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतीनिमित्त ‘इंटरनॅशनल जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड’च्या वतीने प्रमाणपत्र स्वीकारताना शिवसेना नगरसेविका पूनम मोगरे, शिवसेना महानगर संघटक दिगंबर मोगरे. समवेत अजय बोरस्ते, श्याम महाजन आदी.

जीनियस बुकचे अध्यक्ष डॉ. माईक यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र आयोजक तथा नगरसेविका पूनम मोगरे व समितीचे मार्गदर्शक दिगंबर मोगरे यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, माजी आमदार बाळासाहेब सानप, सेना नेते सुनील बागूल, शेफाली भुजबळ, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, प्रभाग सभापती मच्छिन्द्र सानप, नगरसेविका नंदिनी बोडके, नयना गांगुर्डे, पूनम सोनवणे, दीपाली गिते, उल्हास धनवटे, रिमा भोगे, चंदू साडे, संतोष कांबळे, अजय बागूल, मामा राजवाडे, प्रवीण भाटे आदींसह शहर व जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिल्लीचेही तख्त राखतो…
हिरावाडी शिवजयंती यात्रोत्सव समितीने याठिकाणी इंडिया गेटच्या प्रतिकृतीसमोर साकारलेला भव्य शिवपुतळाही लक्षवेधी ठरला. इंडिया गेट आणि शिवाजी महाराज या अनोख्या संकल्पनेने ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..’ या राजा बढे यांच्या महाराष्ट्र गीतातील ओळींची आठवण करून दिली.

महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कितीही कार्यक्रम केले तरी ते कमीच आहे. यंदाच्या शिवजयंतीला काहीतरी आगळेवेगळे व भव्यदिव्य करायचे असे आधीपासूनच ठरवले होते. देवदेवतांच्या यात्रेप्रमाणे शिवयात्रोत्सवाची संकल्पना यंदा अंमलात आणली. त्याचबरोबर हिंदू देवदेवतांप्रमाणे छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ यांची मंदिरेही साकारली. सोबतच पंचवटीतील आराध्यदैवतांचेही दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला. लोकांना ही संकल्पना केवळ आवडलीच नाही तर मनापासून भावलीदेखील. त्यामुळे या देखाव्याने विक्रमापर्यंत झेप घेतली.
– पूनम मोगरे, आयोजक तथा नगरसेविका

हेही वाचा :

Back to top button