कीव; पुढारी ऑनलाईन
Russia attacks Ukraine : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १३७ युक्रेनियनचा मृत्यू झाला आहे. यात सैनिक आणि नागरिकांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ३१६ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित केले. रशियाने कीववर शुक्रवारी पहाटे ४ वाजता क्षेपणास्त्रे हल्ले केले. रशियाकडून युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. मीदेखील रशियाच्या रडारवर आहे. पण मी घाबरून कीव शहर सोडून जाणार नाही, असे प्रत्युत्तर झेलेन्स्की यांनी दिले आहे.
रशियावर आणखी निर्बंध लादावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. रशियाचे हल्ले संपेपर्यंत युक्रेन स्वत:चा बचाव करणे थांबवणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, राजधानी कीवच्या बाहेर रशियन सैन्याशी युक्रेन सैन्य लढा देत असल्याचे युक्रेन लष्कराने म्हटले आहे.
दरम्यान, रशियाच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी युक्रेनमधील नागरिकांनी भूमिगत मेट्रो स्टेशनचा आश्रय घेतला आहे. युक्रेनमध्ये रात्रभर कर्फ्यू लागू होता आणि बॉम्ब हल्ल्यापासून बचाव व्हावा म्हणून युक्रेनमधील मेट्रो स्टेशन उघडी ठेवण्यात आली आहेत. तसेच युक्रेनियन लोकांनी त्यांची घरे सोडली आहेत. सुमारे १ लाखांहून अधिक लोकांनी सुरक्षेसाठी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. जागतिक पातळीवर अशीही चिंता सतावते आहे की, येत्या काळात हे युद्ध अणूयुद्धात परिवर्तित होतंय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्यां यवेस ले ड्रियन यांनी गुरुवारी सांगितले की, "रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी जेव्हा अणवस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली, त्यावेळी त्यांनी हे विसरु नये की, नाटो ही एक आण्विक युती आहे.