शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला यंदा रोइंगपटू मुकणार | पुढारी

शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला यंदा रोइंगपटू मुकणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू केली असून, त्यानुसार मागविलेल्या आवेदनांमधून प्राथमिक यादी प्रसिद्ध केली. या यादीतील रोइंग या खेळाबाबत खेळाडूंच्या गुणांकन पकडताना काही खेळाडूंचे काही स्पर्धांचे गुणांकन पकडलेले नाही. त्यामुळे हे खेळाडू पुरस्काराला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशिक्षक महाराष्ट्र रोइंग संघटनेने निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.

‘रोइंग’ या खेळात सन २०२१-२२ यासाठी ज्या खेळाडूचे नाव प्राथमिक यादीत आहे. त्या खेळाडूचे विविध स्पर्धांचे गुणांकन पकडण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच्या २०१९-२० आणि २०२०-२१ या पुरस्कार वर्षासाठी खेळाडूंचे गुणांकन करताना स्प्रिंट नॅशनल, चॅलेंजर नॅशनल व इनडोअर रोइंग यांसारख्या स्पर्धांचे गुणांकन पकडण्यात आलेले नाही. तर यापूर्वीच्या पुरस्कारासाठी या स्पर्धांचे गुणांकन पकडून खेळाडू पुरस्कारपात्र ठरला आहे. त्यामुळे पुरता गोंधळ उडाला आहे.

गुणांकन नाकारण्यात आलेल्या तिन्ही स्पर्धा भारतीय नौकानयन (रोइंग) संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मान्यताप्राप्त असल्याबाबत महाराष्ट्र राेइंग संघटनेने वेळोवेळी क्रीडा संचालनालयास अवगत केले आहे. तर ज्या ज्या खेळाडूंचे गुणांकन पकडण्यात आलेले नाही, अशा सर्व खेळाडूंनी प्राथमिक पडताळणी अहवालावर ऑनलाइन व नुकतेच क्रीडा संचालनालयात सहसंचालक व उपसंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. गुणांकन पद्धतीबाबत फेरविचार करण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे.

ज्या स्पर्धांवर क्रीडा विभागाचा आक्षेप आहे, त्या भारतीय नौकानयन संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आल्या होत्या. एका खेळाडूला गुण देणे आणि इतर खेळाडूंना गुण न देणे हे अयोग्य आहे. याबाबत राज्य शासनाने विशेषत: क्रीडा विभागाने योग्य तो निर्णय घेऊन या रोइंगपटूंना न्याय देण्याची गरज आहे.

– अंबादास तांबे, प्रशिक्षक

हेही वाचा :

Back to top button