वाल्हे पालखीतळासाठी एक कोटी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

वाल्हे पालखीतळासाठी एक कोटी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या, आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्हे येथील पालखीतळाला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांनी पालखीतळ सुशोभीकरणासाठी व पालखीतळावर विविध विकासकामे करण्यासाठी भरीव निधीची मागणी केली. महसूलमंत्री विखे पाटील यांनी तत्काळ एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिले.

दरम्यान, वाल्हे पालखीतळापासून पर्यायी रस्ता असलेल्या सुकलवाडी, झिरपवस्ती, गुळुंचे मार्गे निरा व सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीवाडी, गायकवाडवाडी मार्गे राख या रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामस्थांमधून वेळोवेळी मागणी होत होती. त्याअनुषंगाने गुरुवारी
(दि. 8) या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, दिलेल्या निधीत रस्ता पूर्ण होत नसल्याने या रस्त्यांसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली. महसूलमंत्र्यांनी संबंधित अधिकारीवर्गाला निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, कोणत्याही परिस्थितीत पालखीकाळात वैष्णवांची गैरसोय होणार नाही, अशी काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

या वेळी महसूल नायब तहसीलदार मिलिंद घाडगे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग स्वाती दहिवाल, पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, नॅशनल हायवेचे राजेंद्र ढगे, महावितरचे शशिकांत बोधले, तलाठी नीलेश अवसरमोल, कोतवाल आनंद पवार आदींसह सरपंच अमोल खवले, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रय पवार, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, धनंजय पवार, जयवंत भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार, सत्यवान सूर्यवंशी, उद्योजक सुनील पवार, राहुल यादव, संदेश पवार, दादासाहेब मदने, दीपक कुमठेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामप्रदक्षिणेला सकारात्मक प्रतिसाद

वाल्हे (ता. पुरंदर) गावची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची परंपरा असलेली ग्रामप्रदक्षिणा आळंदी देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून बंद केली आहे. ती ग्रामप्रदक्षिणा पुन्हा सुरू करण्याची मागणी सचिन लंबाते यांनी केली. या वेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे-पाटील यांनी, ‘काळजी करू नका, सगळं होईल बरोबर,’ असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे लंबाते यांनी सांगितले.

हेही वाचा

नगर : मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवा ; कोतवाली पोलिसांचे आवाहन

बारामती : पालखी सोहळ्यापूर्वी विनानोंदणी दिंड्यांची होणार नोंदणी : महसूलमंत्री विखे पाटील

Back to top button