नाशिक: बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा | पुढारी

नाशिक: बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

सटाणा: पुढारी वृत्तसेवा : बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.८) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यादरम्यान ठिकठिकाणी गारपीटही झाली असून तीन ते चार ठिकाणी घरांची पडझड झाली. तर एका ठिकाणी बैल मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आमदार दिलीप बोरसे व तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील हे तात्काळ नुकसानीच्या पाहनी दौऱ्यावर असून रात्री उशिरापर्यंत एकूण नुकसानीचा अंदाज येईल, असे सांगण्यात आले.

बागलाण तालुक्यात शनिवारी (दि.८) दुपारी चार वाजेनंतर मोसम खोऱ्याकडून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अतिशय जोरदारपणे पडणाऱ्या पावसासोबत विक्रमी वेगाने वाहणारे वादळी वारेही आल्याने नुकसानीत मोठी भर पडली. सद्यस्थितीत तालुक्यात उन्हाळी कांदा काढणी आणि कांदा चाळीत भरण्याचा हंगाम सुरू असून अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शेतकरी वर्गाची त्रेधातिरपीट उडाली. बहुतांशी ठिकाणी कांदा पावसात भिजला असून त्यामुळे त्याची टिकवण क्षमता संपणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्यातील करंजाड, बिजोटे, आखतवाडे, पिंगळवाडे, सटाणा ब्राम्हणगाव, लखमापूर, नामपूरसह संपूर्ण तालुकाभरातच पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी बोराच्या आकाराच्या गाराही पडल्या. विशेषत्वाने वादळी वाऱ्यामुळे आखतवाडे व पिंगळवाडे येथे तीन घरांची नासधूस झाली. आखतवाडे येथे एक बैल मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. काही ठिकाणी विजेचे पोल आणि ट्रान्सफार्मरदेखील उन्मळून पडले आहेत.

ठिकठिकाणी कांदा पावसात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याव्यतिरिक्त घरांवर झाडे पडल्याने तसेच घर, छत, कांदा चाळीचे पत्रे उडाल्यानेही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कांदा, डाळिंब, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button