Nashik : पिंपळदला बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार, एकाच परिसरात चौथा बळी | पुढारी

Nashik : पिंपळदला बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार, एकाच परिसरात चौथा बळी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपळद येथे सायंकाळी ५ च्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात वर्षांची बालिका ठार झाली. एकाच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात हा चौथा बळी गेला आहे.

अंकिता भाऊसाहेब सकाळी (वय 7) ही मुलगी गावामधून दळणाचा डबा घेऊन घराकडे जात असताना बाजूच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने झडप घातली. हा प्रकार घराजवळ अवघे काही फूट अंतरावर घडला. घराच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तींनी बिबट्याची झडप पाहताच धाव घेतली. बिबटयाने पुन्हा उसाच्या शेतात धूम ठोकली. मात्र, मानेवर जखमा झाल्याने अंकिता जागीच गतप्राण झाली. तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी अंकिताला तत्काळ ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. दरम्यान वनरक्षक शिंदे अंजनेरी गडावर बंदोबस्ताला होते. त्यांना माहिती मिळताच तातडीने त्र्यंबकेश्वर येथे आले. त्यांच्यासह पालक पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना झाले.

धुमोडी, वेळूंजे, ब्राह्मणवाडे आणि आता पिंपळद ही काही किलोमीटर अंतराच्या परिघातील गावे असून, या चारही ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे. धुमोडी, ब्राह्मणवाडे, पिंपळद ही नाशिक वनपरिक्षेत्रात आहे. नीलपर्वत परिसरात बिबटयाचा सकाळी आणि सायंकाळी थेट वावर वाढल्याने त्र्यंबकेश्वर शहरात आता दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button