ग्रीस ते मगधपर्यंतच्या इतिहासाची माहिती पुढील वर्षापासून अभ्यासक्रमात | पुढारी

ग्रीस ते मगधपर्यंतच्या इतिहासाची माहिती पुढील वर्षापासून अभ्यासक्रमात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : इतिहासाच्या अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल केला जाणार असून ग्रीसपासून ते मगधपर्यंतच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना याद्वारे करून दिली जाणार आहे. अभ्यासक्रमातील बदलांसाठीच्या ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन’चा मसुदा सरकारकडून तयार करण्यात आला असून त्यात हे विषय शिकविण्याचा प्रस्ताव आहे.

ग्रीस, मगध यासारख्या पुरातन साम्राज्यांचा उदय कसा झाला, भारत आणि जगभरातील वैचारिक विद्यालये, मध्यकालीन जग आणि भारतातील धार्मिक परिवर्तने, वसाहतवादाची सुरुवात तसेच त्यांची धोरणे असे विषय अभ्यासक्रमात सामील केले जावेत, असे मसुद्यात म्हटले आहे. अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यासंदर्भातील मसुदा केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे.

नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कला मंजुरी मिळाली आहे. पुढील वर्षापासून हे विषय अभ्यासक्रमात सामील होतील, असे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांच्या सामाजिक विज्ञान विषयातील 20 टक्के भाग स्थानिक माहितीवर आधारित असेल. 30 टक्के भाग प्रादेशिक व राष्ट्रीय विषयावर आधारित असेल. तसेच 20 टक्के भाग जागतिक संदर्भातील असणार आहे. सामाजशास्त्र विषयाचा विस्तार पुढे जाऊन इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषयांत केला जाईल.

मुघल साम्राज्याशी संबंधित विषय वगळले होते

विशेष म्हणजे अलीकडेच एनसीईआरटीईच्या बारावीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास सांगणारे काही विषय वगळण्यात आले होते. जे विषय कमी करण्यात आले होते, त्यात मकिंग्ज अँड क्रॉनिकल्स, मुघल दरबार (16 आणि 17 वे शतक), ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री-पार्ट 2’ यांचा समावेश होता. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटीईची पुस्तके लागू होतात. उत्तर प्रदेश सरकारनेदेखील मुघलांचा इतिहास सांगणारा अनेक पुस्तकांतील भाग वगळण्याचा निर्णय नुकताच घेतला होता.

Back to top button