नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली | पुढारी

नाशिक : बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन वाघाची मावशी तरली

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील टेंभूरवाडी येथे मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना मंगळवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर “वाघाच्या मावशी’ने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन जीव वाचवला.

टेंभूरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ पहाटेच्या सुमारास बिबट्या मांजरीचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने मांजरीसह विहिरीत पडला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेतला. त्यानंतर मांजरीनेही जीव वाचवण्याची धडपड करत पाण्याच्या कडेला पोहत जाऊन थेट विबट्याच्या शेपटीचा आधार घेतला. सकाळी बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणला. सांगळे यांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या व मांजर पाण्यात पडलेले दिसले.

त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणगावचे वनपरिमंडळ अधिकारी सुनील वनरक्षक किरण गोर्डे, आर. इथे, पाटील, रुपवते घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या व मांजरीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात आली.  यावेळी बिबट्या व मांजरीला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

 

Back to top button