नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा | पुढारी

नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३० तारखेला मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनला मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. एका मतपत्रिकेची लांबी ६८.५ सेंटिमीटर असून, त्याची रुंदी १५ सेंटिमीटर इतकी आहे. या भव्यदिव्य मतपत्रिकेची सध्या प्रशासनात चर्चा रंगली आहे.

निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात १६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. येत्या ३० तारखेला पदवीधर मतदार हे संबंधित उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत. अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. जिल्ह्यात ६९ हजार ६५२ मतदारांची नोंद झाली असून, प्रशासनाने १५ ही तालुक्यांत ९९ मतदान केंद्रे अंतिम केली आहेत.

पदवीधरची निवडणूक ही गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर घेण्यात येणार आहे. पदवीधर मतदारांनी मतपत्रिकेवर त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर १, २, ३ नुसार पसंती क्रमांक लिहिणे बंधनकारक असेल. त्यानुसार जिल्ह्यासाठी आवश्यक मतपत्रिका आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यातील एका मतपत्रिकेची लांबी ६८.५ सेंटिमीटर असून, त्याची रुंदी १५ सेंटिमीटर इतकी आहे. सध्या पोलिसांच्या बंदोबस्तात या मतपत्रिका जिल्हा लेखा व कोषागार विभागात जतन करण्यात आल्या आहेत.

मतदारांना विशेष नैमित्तिक रजा
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी कळविले आहे.

मद्यविक्रीस मनाई
पदवीधरची निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तशा सूचना दिल्या आहेत. सोमवारी (दि. ३०) पदवीधरसाठी मतदान होत असून, नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून मद्यविक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असेल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

Back to top button