पारनेर : कॉलेजकडून विद्यार्थिनीची अडवणूक; कागदपत्रे देण्यास टाळाटाळ | पुढारी

पारनेर : कॉलेजकडून विद्यार्थिनीची अडवणूक; कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

पारनेर(नगर); पुढारी वृत्तसेवा : भाळवणी येथील विजय गंगा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनीचा शाळा सोडल्याचा दाखला व मूळ (ओरिजनल) कागदपत्रे देण्यास कॉलेज प्रशासनाने टाळाटाळ केली. त्यासाठी पैशाची मागणी केली. त्यामुळे या विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तिने सहायक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा शल्य चिकित्सक, पोलिस अधीक्षक, पारनेर तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन पाठविले आहे.

अंजली संभाजी करंदीकर (रा. करंदी, ता. पारनेर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता बारावी विज्ञान उत्तीर्ण असून, अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. लॉकडाऊननंतर ती भाळवणी येथील विजयगंगा नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेली. तिने शाळा सोडल्याचा दाखला व कागदपत्रे दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी कॉलेजमध्ये जमा करून पाच हजार रूपये फी भरली. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने तिला इतर कागदपत्रे आणण्यासाठी यादी दिली. ही कागदपत्रे आणल्यानंतर तुझी ऑनलाईन अ‍ॅडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि शिष्यवृत्तीचा अर्ज देखील भरला जाईल, असे सांगण्यात आले.

परंतु, तिचे गाव कॉलेजपासून 28 किलोमीटर लांब असल्याने, कोरोना, लॉकडाऊन, एसटीचा संप यामुळे साधनांअभावी ती कॉलेजला जाऊ शकली नाही. त्यामुळे तिचे सन 2021-22 हे शैक्षणिक वर्ष वाया गेले. त्यामुळे तिने सन 2022-23 या वर्षात पारनेरमध्येच प्रवेश घेऊन पदवी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जमा केलेला दाखला व इतर कागदपत्रे मिळण्यासाठी तिने विजयगंगा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांकडे 24 जून 2022 रोजी रितसर अर्ज केला.

मात्र, कॉलेजचे संबंधित अधिकारी व प्रशासनाने तिच्या अर्जाची दखल घेतली नाही. तिने पोलिस अकादमीत भरती पूर्व प्रशिक्षण घेऊन पोलिस भरतीचा फॉर्म भरला आहे. मात्र, नर्सिंग कॉलेजकडून तिची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत आहे. तिने दि.26 पासून पारनेर येथील तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर तिचेे चुलते राजेंद्र शंकर करंदीकर, वडील संभाजी शंकर करंदीकर, आई करुणा संभाजी करंदीकर यांच्याही सह्या आहेत.

कागदपत्रांसाठी मागितले पैसे!

विजयगंगा नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डा.ॅ किरण रोहकले व प्राचार्यांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला. तुझ्यामुळे आमची एक जागा रिक्त राहिली आणि आर्थिक नुकसान झाले. जर तू प्रतिवर्षी एक लाख पन्नास हजारप्रमाणे तीन वर्षांचे पैसे भरले, तरच तुझे कागदपत्रे देऊ. अन्यथा देता येणार नाही, असे सांगितले. त्यांनी माझ्याकडे बेकायदेशीर पैशाची मागणी करत कागदपत्रे न दिल्याने शैक्षणिक नुकसान झाल्याचे विद्यार्थिनी अंजली करंदीकर हिने सांगितले.

Back to top button