नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी | पुढारी

नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

गुटखा बनविण्यासाठी दुर्मिळ अश्या खैराच्या लाकडाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाण्यामध्ये उघडकीस आला आहे. विभागाच्या जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडाची कत्तल सुरू  असताना वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खैर नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेल्या नाशिकच्या सुरगाणा आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर वन संपदा आहे. अनेक दुर्मिळ झाडे या ठिकाणी आढळतात. त्यापैकी किंमती व दुर्मिळ झाड म्हणजे खैर होय. कुकडणे व गुजरात सीमेलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर खैराचे झाडे आहेत. खैराचे अनेक उपयोग आहेत. खैराच्या झाडापासून गुटख्यासाठी लागणारा कात व रसायन बुकटी बनवण्यात येत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. नेमकी हीच बाब हेरून तस्करांनी आता खैराच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवला असून रात्रीच्या वेळी जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडाची तोड करून तस्करी केली जात आहे. खैराच्या झाड कापून झाले की खोड जाळून पुरावा नष्टही केला जात आहे.

विशेष म्हणजे वन विभागाचे गार्ड, कर्मचारी व तपासणी केंद्र असतांना हे लाकडे बाहेर जातातच कसे असा सवाल उपस्थित केल जातो आहे. वन विभागाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

करोडो रुपयांच्या झाडांची तोड, किलोला इतका भाव

गुटखा बनविण्यासाठी उपयोग होत असल्याने खैराच्या लाकडाला किलोला 38 ते 40 रुपये भाव मिळतो. एका झाडापासून सुमारे 2 ते 3 टन लाकूड मिळते. त्यामुळेच करोडो रुपयांची खैराच्या झाडांची तोड झाली आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला याबाबत कळविले मात्र त्यांच्याकडून कुठलीही दखल घेण्यात येत नसल्याने वनविभागाच्या कृपा आशीर्वादानेच खैराच्या तस्करीचा गोरखधंदा सुरु असल्याचा संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. आतातरी वनविभागाने जागे होऊन उरलेले खैराच्या झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात  आहे.

हेही वाचा :

Back to top button