नाशिकचा मोनोरेल, मेट्रोचा प्रश्न लवकरच सुटणार : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

नाशिकचा मोनोरेल, मेट्रोचा प्रश्न लवकरच सुटणार : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिककर शहराच्या पायाभूत सुविधांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रधान्य देत आहे. मोनोरेल, मेट्रो, नाशिक-पुणे रेल्वेसह विमानसेवेचा प्रश्न लवकरच मार्ग लागणार असून, केंद्र सरकार लवकरच नाशिककरांना मोठे गिफ्ट देणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नाशिक येथे चार दिवसांपासून सुरू असलेल्या नरेडको ‘होमेथॉन’ गृहप्रदर्शनाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिककरांच्या अनेक मागण्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पोहोचल्या आहेत. त्यात नाशिक शहराला भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अंतर्गत मोनोरेल, मेट्रो आणि नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न सुटणार आहे. याबरोबरच नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेला आयटी प्रकल्पही मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडवणीस प्रयत्नशील आहेत. नाशिकमधील प्रदर्शन पाहून राज्यातील अनेक नागरिक सेकंड होमसाठी नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे बोलणी केली आहे. येत्या वर्षांत काही कंपन्या नाशिकमधून विमानसेवा सुरू करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी आ. देवयानी फरांदे, भाजप ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, नरेडको नाशिक शाखेचे अभय तातेड, सचिव सुनील गवादे, समन्वयक जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे, दीपक चंदे, पुरुषोत्तम देशपांडे आदी उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी अविनाश शिरोडे, राजेंद्र बागड, पुरुषोत्तम देशपांडे, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, श्रीहर्ष घुगे, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन आदींनी परिश्रम घेतले.

फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या

नागरिक आपला आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर घेतात. त्यामुळे प्रदर्शन पाहता बांधकाम व्यावसायिकांनी त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. बांधकाम व्यावसायिकांना ज्या समस्या भेडसावत असतील, त्याबाबतही सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

चार दिवसांत तीनशे फ्लॅट्सची विक्री

नरेडको होमेथॉन गृहप्रदर्शनात राज्यभरातून प्रतिसाद दिल्याचे संयोजक जयेश ठक्कर यांनी सांगताना चार दिवसांत नाशिकसह बाहेरील जवळपास ६० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली. चार दिवसांत जवळपास तीनशे फ्लॅट्सची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button