जारकरवाडी परिसरात बिबट्याची दहशत; एकाच दिवशी दोन प्राण्यांवर हल्ला | पुढारी

जारकरवाडी परिसरात बिबट्याची दहशत; एकाच दिवशी दोन प्राण्यांवर हल्ला

लोणी-धामणी (ता. आंबेगाव): पुढारी वृत्तसेवा : एका दिवसात एकाच गावात दोन ठिकाणी बिबट्याने केला हल्ला. एका घटनेत वासरू, तर दुसर्‍या घटनेत मेंढी मृत्युमुखी पडली. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे रविवारी (दि. 25) पहाटे तीन ते चारच्या सुमारास एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. जारकरवाडीच्या खडकमाळ परिसरात बिबट्याने दामू केरू करगळ (ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांच्या मेंढी कळपावर हल्ला करत एक मेंढी फस्त केली, तर त्याच रात्री रामदास यशवंत ढोबळे यांच्या भरवस्तीत असणार्‍या घरासमोरील गोठ्यातून वासरू फरफटत नेत उसाच्या शेतात नेऊन फस्त केले.

जारकरवाडी परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे बिबट्याचे लपणक्षेत्र कमी होत चालले आहे. ज्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. वडजादेवी मंदिर परिसर, घोडखणा, झांजूर्णेबाबा मंदिर परिसर, बोगद्याजवळील परिसर, डिंभे धरणाच्या कालव्यालगतच्या शेतात, ओढ्याच्या परिसरात अनेकदा लोकांना शेतात काम करत असताना बिबटे दिसून येतात.

मात्र, लोकांची चाहूल लागताच ते उसाच्या शेतात अथवा दाट झाडी झुडपात लपून बसतात, अशी माहिती या परिसरातील शेतकर्‍यांनी दै. ‘पुढारी’ला दिली. याबाबत वनविभागाने त्वरित लक्ष घालून या परिसरात पिंजरा लावावा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडण्याअगोदर बिबट्यांना जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी वन विभागाकडे केली आहे.

Back to top button