गुजरात निवडणुकीतील विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष | पुढारी

गुजरात निवडणुकीतील विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२ जागांपैकी १५६ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरतर्फे भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी नरेंद्र मोदी जिंदाबाद…देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोंदी जैसा हो..भारत माता की जय.. वंदे मातरम…अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमण, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू, काशिनाथ शिलेदार, अरुण शेंदुर्णीकर, सागर धर्माधिकारी, सुरेश पाटील, फिरोज शेख, शाहिन मिर्झा, शिवाजी गांगुर्डे, प्रा. कुणाल वाघ, रुची कुंभारकर, हेमंत शुक्ल, सोनल दगडे, धनंजय पळसेकर, उदय जोशी, वसंत उशीर, अहमद काझी, हिना शेख, मुजब्बील मिर्झा, राजू शेख, रफिक शेख आदी उपस्थित होते.

 नाशिक ठरले आकर्षण

 

गुजरातमधील दुर्गम आणि आदिवासीबहुल भाग असलेल्या व्यारा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून काॅंग्रेसची मक्तेदारी हाेती. मात्र याच मतदार संघात या निवडणुकीत चित्र पालटले असून, याठिकाणचे सर्व सूत्रे हाती घेत पक्षाचे व्यारा मतदार संघाचे निरीक्षक तथा नाशिक पूर्वचे आमदार अॅड. राहुल ढिकले तसेच शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी व्यारा मतदार संघात कमळ फुलविले आहे.

केवळ व्यारा मतदार संघच नव्हे, तर डांग, मांडवी आणि बडाेदा या मतदार संघातही नाशिकच्या आमदारांपासून तर पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला जुंपत विजयाचे शिल्पकार हाेण्याचा मान मिळविला आहे. नाशिकमधील भाजप आमदारांसह पदाधिकाऱ्यांकडे गुजरात विधानसभा मतदार संघातील प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली हाेती. त्यापैकी व्यारा मतदार संघ दुर्गम व माजी मुख्यमंत्री अमरसिंग चाैधरी यांचा गड मानला जातो. याठिकाणची जबाबदारी आमदार ढिकले व केदार यांच्याकडे हाेती. याकाळात त्यांनी तळागाळापर्यंत जात स्थानिक पदाधिकाऱ्यांसाेबत विजयाचे समिकरण जुळवून आणले. मतदार संघ भाजपसाठी अनुकूल नसल्याने आम आदमी पक्षाकडे संबंधित मते कशी जातील याचे समिकरण मांडण्यात आले. त्यानुसार व्यारा विधानसभा मतदार संघात कित्येक तपानंतर कमळ फुलत माेहनभाई काेकणी यांच्यारूपाने विजय मिळाला. आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे बडाेदासह पाच मतदार संघाची जबाबदारी होती. त्यापैकी चार मतदार संघात कमळ फुलले आहे. आठ दिवस आमदार फरांदे यांनी बडोदा मतदार संघात प्रचाराची जबाबदार पार पाडली. आमदार राहूल आहेर तसेच भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी डांग विधानसभा मतदारसंघाचे काम पाहिले.

आजपर्यंत व्यारा मतदार संघात काॅंग्रेसची चलती होती. अशा दुर्गम भागातील मतदार संघात पंधरा दिवसात प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचे काम केले. भाजपची देशपातळी तसेच गुजरातमधील विकास कामे जनतेपर्यंत पोचवली.

– अॅड राहुल ढिकले, आमदार (पूर्व)

भाजपवरील विश्वास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील भरवसा अधिक बळकट झाला आहे. मोदी हेच देशाचे नेतृत्व करू शकतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पंतप्रधान मोदी यांचे हात अधिक बळकट करावे. आम आदमी पक्षाने फुकटच्या अनेक योजना जाहीर केल्या परंतु, त्यांच्या या योजनांना जनता भुलली नाही.

– देवयानी फरांदे, आमदार (मध्य)

हेही वाचा :

Back to top button