‘महावितरण’ची धडक मोहीम; सात दिवसांत 7867 नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलले | पुढारी

‘महावितरण’ची धडक मोहीम; सात दिवसांत 7867 नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वीज ग्राहकांचा विशेषतः शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी महावितरणने केवळ 7 दिवसात 7867 नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने सर्व संबंधित अधिकार्‍यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी दिवसरात्र पाठपुरावा करून कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टीमवर्कच्या आधारे राज्यातील 7867 नादुरुस्त रोहित्रे बदलण्याचे काम पूर्ण केले.

एका विशेष कृती आराखड्याच्या अंतर्गत नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयातर्फे क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध करून देण्यात आले. रोहित्र दुरुस्त करणार्‍या एजन्सींनाही तातडीने रोहित्रे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

29 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यात नादुरुस्त असलेल्या एकूण 6098 वितरण रोहित्रांपैकी 7 डिसेंबर 2022 पर्यंत 5917 वितरण रोहित्रे बदलण्यात आली आहेत. याशिवाय 29 नोव्हेंबर 2022 नंतर नादुरुस्त झालेल्या रोहित्रांपैकी 1950 रोहित्रेही महावितरणतर्फे बदलण्यात आली. नादुरुस्त वितरण रोहीत्रे बदलण्यासाठी रोहित्रांची मुबलक उपलब्धता असावी यासाठी नादुरुस्त असलेले रोहित्रे त्वरीत दुरुस्त करण्याच्या सूचनादेखील विजय सिंघल यांनी दिल्या.

Back to top button