नाशिक : सोळा गाव पाणीयोजनेच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू | पुढारी

नाशिक : सोळा गाव पाणीयोजनेच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतानाही केवळ जलवाहिनी नादुरुस्त असल्याच्या कारणाने पाणीपुरवठा वितरणावर मोठा परिणाम झाला होता. परंतु बुधवारपासून दुरुस्तीस सुरुवात झाली असून, गुजरात राज्यातून नांदूरमधमेश्वर बंधारा परिसरात मोठ्या संख्येने जलवाहिन्या आल्या आहेत.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुरुवातीला लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीयोजनेच्या दुरुस्तीकरिता १३ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, दर वाढल्याने पुन्हा निविदा प्रसिद्ध करावी लागल्याने अखेर २० कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले होते.

जलवाहिनी जागोजागी फुटल्याने या गावांमध्ये तब्बल २५ ते ३० दिवस उशिराने पाणीपुरवठा प्रशासनाला करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. गुजरातमधून आलेल्या जलवाहिन्यांचे पूजन १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष आणि मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, ठेकेदार काळे, उपसरपंच रामनाथ शेजवळ अफजल शेख, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, अनिल विंचुरकर, १६ गाव समितीचे सचिव, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button