Nashik : लव्ह जिहादविरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटनांचा विराट मोर्चा, मोठी गर्दी | पुढारी

Nashik : लव्ह जिहादविरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटनांचा विराट मोर्चा, मोठी गर्दी

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू समाजाच्या वतीने आज सोमवारी (दि. २८) विराट हिंदू मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे.  सुुरुवातीला शहरातील बी. डी. भालेकर मैदानावर हिंदुत्ववाद्यांची मोठी गर्दी झाली. तेथून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

दिल्ली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लव्ह जिहादच्या नावे मुलींवर धार्मिक, शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राज्यात हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरासह जिल्हाभरातील हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झालेले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोप-यातून हिंदू बांधव याठिकाणी आले आहेत.

या मोर्चात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. हातात भगवे झेंडे व फलक घेऊन घोषणा दिल्या जात आहेत. अनेकांनी भगवे वस्त्र परिधान केले आहे. बी. डी. भालेकर मैदानापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार असून तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले असल्याने शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

Back to top button