नाशिक : निफाड तालुक्यातील पहिलीच सीमा सुरक्षा दलाची जवान शहीद | पुढारी

नाशिक : निफाड तालुक्यातील पहिलीच सीमा सुरक्षा दलाची जवान शहीद

नाशिक, ओझर पुढारी वृत्तसेवा :
निफाड तालुक्यातील पहिली सीमा सुरक्षा दलातील जवान गायत्री विठ्ठल जाधव (वय 23) मंगळवारी शहीद झाली. राजस्थानमधील अलवर येथे दलाचे प्रशिक्षण घेत असताना खड्ड्यात पडून डोक्याला मार लागल्याने ती जखमी झाली होती. तिच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र, अखेर तिची झुंज संपुष्टात आली.

बथनाहा (जिल्हा अररिया, बिहार) येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारी देवगाव येथील गायत्रीने अत्यंत गरिबीच्या परिस्थितीवर मात करून सीमा सुरक्षा दलापर्यंत झेप घेतली होती. रोजंदारी करत देवगाव येथील श्री.डी.आर. भोसले विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लासलगाव येथीलच पार्थ अकॅडमी येथे ट्रेनिंग घेतले. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलातील ट्रेनिंगसाठी 21 मार्च 2021 रोजी तिची निवड झाली होती.

त्यादरम्यान अपघात झाल्याने अलवर येथे मेंदूवर शास्रक्रिया करण्यात आली व ती परत ट्रेनिंगला रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने एसएमएस हॉस्पिटल, जयपूर येथे मेंदूवर दुसरी शस्रक्रिया करण्यात आली. यानंतरही ती पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 30 मार्च 2022 रोजी बथनाहा येथे नेपाळ सीमेवर ती कर्तव्यावर रुजू झाली. मात्र रुजू झाल्यानंतर कर्तव्यावर असताना तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. त्यानंतर नाशिक व मुंबई येथे तीन महिने उपचार घेतले. बरे न वाटल्याने अधिक उपचारासाठी एम्स, दिल्ली येथे नेण्याची तयारी नातलग करीत असतानाच मंगळवारी दुपारी तिची तब्येत खूप खालावली व दृष्टी गेल्याने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. परंतु दुपारी सव्वादोनच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. कागदपत्रांची पूर्तता करून अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे गायत्रीचे मामा गणेश कोकणे यांनी सांगितले.

सैन्यात जाण्याचा होता मानस…
गायत्री अत्यंत बुद्धिमान व जिद्दी असल्याने सैन्यात जाण्याचा तिचा मानस होता.त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून सैन्यात जाणार्‍या पहिल्या दोन मुलींमध्ये व निफाड तालुक्यात सैन्यात जाण्यात तिचा पहिला नंबर लागतो. गायत्रीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई-वडील मोलमजुरी करतात. तिला चार बहिणी असून उपचारासाठी तब्बल 8 लाख रुपये खर्च आला आहे.

हेही वाचा :

Back to top button