पशुवैद्यक हत्या प्रकरण : ‘आरोपी नाही सापडला तर नोकरी सोडून देईन’ | पुढारी

पशुवैद्यक हत्या प्रकरण : 'आरोपी नाही सापडला तर नोकरी सोडून देईन'

धुळे; पुढारी वृत्तसेवा : पशुवैद्यक हत्या प्रकरण : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे नजीक एका पशुवैद्यकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. पण रात्रीच पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आंदोलकांसमोर आरोपीला अटक करण्यात दिरंगाई झाल्यास पोलिस सेवेतून राजीनामा देईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. पशुवैद्यक हत्या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले आहेत.

दरम्यान, रात्री उशिरा यातील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथे राहणारे प्रेमसिंग गिरासे हे पशुवैद्यक म्हणून काम करत होते. शिंदखेड्याच्या पशू रुग्णालयात ते सेवा देत होते.

यासाठी त्यांना दराणे ते शिंदखेडा पर्यंत दररोज ये जा करावे लागत असल्याने त्यांनी पोळ्याच्या मुहुर्तावर नवीन दुचाकी खरेदी केली. शिंदखेडा येथून ही नवीन दुचाकी घेवून ते सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले. पण चिमठाणे गावाजवळील विश्रामगृहाजवळ त्यांना तिघा तरुणांनी अडवून त्यांची दुचाकी हिसकावण्याचा प्रयत्न सुरु केला. याला प्रेमसिंग गिरासे यांनी मज्जाव करताच या चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.

यावेळी गिरासे यांनी मदतीसाठी आवाज दिल्यानंतर तिघा मारेकऱ्यांनी पलायन केले. यावेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सोनगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गिरासे यांच्या मृत्यूमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. स्थानिक पोलिसांनी या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यांना यश येत नसल्याची माहिती कळाल्याने पेालिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासमवेत संवाद साधला.

तरुण गिरासे यांच्या मृत्यूचे मला देखील दु:ख आहे. रस्त्यावर गुन्हा करणाऱ्यावर कारवाई करण्याची तसेच त्यांच्यावर जरब बसवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. यातील आरोपी लपले असतील तरीही त्यांना शोधून काढेन. हे आरोपी सापडले नाही तर नोकरी सोडून देईन, अशा शब्दांत पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

यानंतर रात्री उशीरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक पंडीत यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने हालचाली करीत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button