आयुर्वेद क्षेत्रातील करिअर संधी | पुढारी

आयुर्वेद क्षेत्रातील करिअर संधी

मेघना ठक्कर

पूर्वीपासून आपल्याकडे निसर्गाच्या मदतीने काही उपचार केले जातात. प्राचीन काळी उपचाराची जी पद्धत प्रचलित होती, तिला आयुर्वेदिक उपचार पद्धती असे म्हणतात. आज वैद्यक शास्त्र खूप प्रगत झाले आहे. त्यात विविध शाखाही निर्माण झालेल्या आहेत. मात्र आयुर्वेदिक उपचारांना आजही मोठी मागणी आहे. आयुर्वेद क्षेत्रात उत्तम करिअर करता येते.

वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली आहे. अनेकविध नव्या शाखांचा विस्तार यामध्ये होताना दिसतो आहे. तरीही आयुर्वेदिक उपचार पद्धतीला आजही मोठी मागणी आहे. विविध रोगांवर यशस्वी उपचार करण्यासाठी ही प्राचीन पद्धती आजही तितकीच प्रभावी आहे. आयुर्वेद अनेक आजारांवर प्रभावी आणि यशस्वी ठरत असल्याने त्याची लोकप्रियता जगभरात पोहोचली आहे. त्यामुळे परदेशातही आयुर्वेदिक उपचारांचा वापर केला जात आहे. विविध संस्था आयुर्वेद शाखेशी संबंधित अभ्यासक्रम चालवतात.

देशात विविध ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालये आहेत, जिथे आयुर्वेदविषयक अभ्यासक्रम चालवले जातात. पदवी पातळीचा अभ्यासक्रम करण्यासाठी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक चिकित्सा अँड सर्जरी (बीएएमएस) अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. एक वर्षाच्या इंटर्नशिपसह साडेपाच वर्षांच्या कालावधीचा हा कोर्स असतो. पदवी मिळवल्यानंतर आयुर्वेद शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमडी) आणि एमएस (आयुर्वेद) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. आयुर्वेदाशी निगडित संशोधनात रुची असेल तर सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदा अँड सिद्धा या संस्थेत संशोधन करण्याच्या संधी मिळू शकतात. हे सर्व अभ्यासक्रम दीर्घ कालावधीचे आहेत. त्यातही तुलनात्मक दृष्टीने अल्प मुदतीचे प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमही आयुर्वेदात चालवले जातात.

* शैक्षणिक पात्रता : भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. सीबीएसईकडून राष्ट्रीय पातळीवरील प्री-मेडिकल आणि प्री-डेंटल प्रवेश परीक्षा तसेच इतर प्रवेश परीक्षांच्या आधारे बीएएमएस या पदवीला प्रवेश घेऊ शकतो. पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी पदव्युत्तर पदवी परीक्षा जसे आयुर्वेद शाखेत एमडी, एमएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे एमबीबीएसची पदवी आहे, त्या सर्वांना आयुर्वेद शाखेच्या पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेता येतो.

* वैयक्तिक गुण : आयुर्वेदामध्ये पदवी मिळवून वैद्य म्हणून सराव सुरू करण्यासाठी काही वैयक्तिक गुण आवश्यक आहेत. जसे वनौषधी, वनस्पतींचा औषधी वापर यांची योग्य माहिती असावी. तसेच संवाद साधण्याची शैली असावी, जेणेकरून रुग्णांच्या आरोग्य समस्या ऐकून घेण्याचा धीर असला पाहिजे. तसेच त्यांना आरोग्याविषयी योग्य सल्ला देऊ शकता.

* करिअरच्या संधी : पदवी घेतल्यानंतर उमेदवारांना सरकारी आणि खासगी दोन्ही ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. पात्र उमेदवारांची नियुक्ती आयुर्वेदिक रुग्णालये आणि आयुर्वेदिक दवाखान्यात कनिष्ठ पदावर नियुक्ती होऊ शकते.

पुरेशा अनुभवानंतर वरिष्ठ डॉक्टर म्हणून नियुक्ती होऊ शकते. आयुर्वेदासारख्या शाखेत उमेदवाराचे वैयक्तिक ज्ञान आणि तपासण्याची पद्धत यावर त्याचे यश अवलंबून असते. आयुर्वेदासारख्या क्षेत्रात शिक्षण व संशोधनाच्याही खूप मोठ्या संधी आहेत.

Back to top button