शिक्षक भरती प्रक्रियेत आकड्यांचा खेळ, जागांचा बसेना मेळ! | पुढारी

शिक्षक भरती प्रक्रियेत आकड्यांचा खेळ, जागांचा बसेना मेळ!

मुंबई ; पवन होन्याळकर : शिक्षक भरती नावाने प्रचंड जागांच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निम्मीच पदे भरायची, असा आकड्यांचा खेळ सध्या सुरू आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुमारे 12 हजार जागांची घोषणा केली.

ती शिक्षक भरती अर्धवट असताना नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 6 हजार 100 रिक्तपदे भरण्याचे जाहीर केले. घोषणा मोठ्या होतात, मात्र प्रत्यक्ष जागा किती आहेत आणि कोणत्या भरल्या जाणार हा संशोधनाचा विषय ठरत आहे. यामुळे जागांची शाळानिहाय आकडेवारी समोर यावी अशी अपेक्षा भावी गुरुजी व्यक्त करीत आहेत.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी 561 व्यवस्थापनांच्या 2062 रिक्त पदांसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी मुलाखतीसह शिक्षकांच्या पद भरतीसाठी शिफारस केल्याचे सांगितले. यात काही जागांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र 9 ऑगस्ट 2019 च्या यादीच्या विनामुलाखतीच्या रिक्त जागा आता कधी भरणार ? याकडे अभियोग्यताधारकांचे लक्ष लागले आहे.

विनोद तावडे शिक्षणमंत्री घोषणा

विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांनी शिक्षण सेवकांच्या सुमारे 12 हजार 140 जागा भरण्याची घोषणा 2017 मध्ये केली होती. पहिल्या टप्प्यात 5 हजार 822 पदांची यादी पवित्र पोर्टलवर 9 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली. प्रत्यक्षात 2 हजार 264 शिक्षक रूजू झाले. यात 3 हजार 258 पदे रिक्त राहिली. या 5 हजार 822 पदांपैकी जिल्हा परिषदेतील 3 हजार 530, महानगरपालिकेतील 1हजार 53, नगरपालिकेतील 172 व खासगी प्राथमिक शाळांमधील 1 हजार 67 उमेदवारांची निवड सूची जाहीर करण्यात आली.

मुलाखतीशिवाय जागा भरण्यामध्ये रिक्त राहण्याचे प्रमाणही अधिक राहिले असल्याचे दिसून आले. इयत्ता सहावी ते आठवी या गटात मुख्यत्वे इंग्रजी गणित व विज्ञान विषयाकरिता अर्हताप्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे 2 हजार 392 पदे रिक्त राहिली. मराठी माध्यमाच्या शाळांमधील 2 हजार 311, उर्दू माध्यमाच्या शाळांमधील 697, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 237 पदांवर पात्र उमेदवार मिळालेले नाहीत. तसेच हिंदी 27, कन्नड 12 आणि पालिकेच्या हिंदी माध्यमाची 13 अशीही पदे या यादीत रिक्त राहिली आहेत.

आरक्षणनिहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील 369, इतर मागासवर्गीय 301, एसईबीसी 232, ईडब्लूएस 161, खुल्या गटातील 116, भटक्या जमाती ब, क, व ड प्रवर्गातील 227, विमुक्त जाती प्रवर्ग 81 आणि विशेष मागास प्रवर्गातील 65 पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे प्रत्यक्षात 24 हजार शिक्षकांची भरती करू म्हणणार्‍या तत्कालीन सरकारने केवळ 12 हजार जागांची जाहिरात काढून त्यातही जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या केवळ 3 हजार जागांची भरती करत अन्याय केला.

Back to top button