Corona : नागपुरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीय : डाॅ. नितीन राऊत | पुढारी

Corona : नागपुरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीय : डाॅ. नितीन राऊत

नागपूर, पुढारी ऑनलाईन : “मागील काही दिवसांमध्ये कोरोना (Corona) रुग्णसंख्या ही दुप्पट झाली आहे. नागपूर जिल्ह्यात एक आकडी कोरोनाग्रस्तांच्या संख्येची आकडेवारी ही दोन आकडी झालेली आहे. त्यामुळे आमच्या येथे तिसरी लाट आली आहे. त्यामुळे लवकरच आपत्ती व्यवस्थापनाची बैठक होणार आहे. कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत”, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील नेते डाॅ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

सोमवारी नागपूर विभागीय आयुक्तालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारांशी ते बोलत होते. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, रात्रीची संचारबंदी असे काही निर्बंध लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी सांगितलेली माहिती चिंताजनक आहे.

पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले की, “नागपूर जिल्ह्यात रविवारी २४ तासांमध्ये १० नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यापूर्वी ही संख्या सातत्याने एक आकडी  होती. ही आकडेवारी जिल्ह्यात तिसरी लाट (Corona) आल्याचं दर्शवते आहे. त्यामुळे आता नागपूर शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागात स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागतील”, असंही ते म्हणाले.

“येत्या तीन दिवसांत निर्बंधांसंबंधीचा निर्णय घेतला जाईल. त्यानुसार हॉटेलच्या वेळा रात्री १० ऐवजी आता रात्री ८ पर्यंत, दुकाने रात्री १० ऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंत, शनिवार आणि रविवारला बाजार बंद ठेवण्यासारखे कटू निर्णय घेतले जाणार आहेत. त्यापूर्वी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल संघटना, प्रसिद्धी माध्यमांतील अधिकारी, लोकप्रतिनिधींसह इतरांशी चर्चा करून त्यांचेही मत जाणून घेतले जाणार आहे”, असंही नितीन राऊत यांनी सांगितले.

“नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहे. लवकरच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली जाईल. त्यानंतर निर्बंध घोषित केले जातील. मंत्रिमंडळाच्याही बैठकीत या विषयावर चर्चा करून शासनाकडून निर्बंध लावले जाणार आहेत”, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

पहा व्हिडीओ : ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा

Back to top button