Anil Gote : सत्ता संघर्षासाठी होणारा अमर्याद खर्च ‘ईडी’ला दिसत नाही का? अनिल गोटेंचा सवाल | पुढारी

Anil Gote : सत्ता संघर्षासाठी होणारा अमर्याद खर्च 'ईडी'ला दिसत नाही का? अनिल गोटेंचा सवाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

माणसं हृदयाने विचार न करता खीशाने विचार करतात, त्यावेळी सारासार बुद्धी नष्ट होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्याच्या प्रश्नावरून केली. या सत्ता संघर्षासाठी होणाऱा अमर्याद खर्च ईडीला दिसत नाही काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जनता दलाचे सरकार समोर अशाचप्रकारे संकट आल्याच्या प्रसंगाची देखील आठवण करून दिली.

राज्यात शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर राजकीय स्थित्यंतराचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या विषयावरून आता धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाष्य केले आहे. देशात पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे जनता पार्टीचे सरकार असताना द्विसदस्य मुद्द्यावरून मधु लिमये व राजनारायण यांनी सरकारच्या समोर मोठे आव्हान उभे केले. यावेळी पंतप्रधान देसाई यांच्या बाजूने स्व जॉर्ज फर्नांडिस यांनी दोन तास भाषण केले. त्या कालावधीत बापूसाहेब काळदाते हे जनता पक्षाचे खासदार होते. त्यांच्यासमवेत आपण जात असताना आपण त्यांना मधु लिमये यांना भेटावे का, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र बापूसाहेब यांनी केलेले वक्तव्य फार बोलके होते. लिमये यांना जे भेटण्यासाठी गेले त्यांच्यातच परिवर्तन होऊन ते बदलून आले असे त्यांनी सांगितले. देसाई यांच्या पाठिंब्यासाठी भाषण देणारे जॉर्ज फर्नांडिस देखील यांना भेटून पूर्ण बदलल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितले. आजची राजकीय स्थिती देखील तशीच आहे. शिवसेना पक्ष नेते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करून जाणारे आमदार हे थेट गुवाहाटी येथे पोहोचत आहेत. ही परिस्थिती पाहता इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसते आहे असे गोटे यांनी सांगितले आहे.

सध्या राज्यात सत्तेचे बाजारीकरण पाहायला मिळते आहे. यापूर्वी असे चित्र कधीही पाहायला मिळाले नाही. राज्यात यापूर्वी देखील सत्तांतर झाली. फाटाफुटी झाली पण काळ्या पैशांचा सर्रास वापर आणि राजकारणाचे इतके विभक्त रूप यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. नवीन राज्यकर्ते आल्यानंतर देखील सध्या राज्यात असलेल्या परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या जीवनात फार बदल होणार नाही. सामान्य माणसाला या सरकार बदलण्याचा फायदा होईल अशी शक्यता नसल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.

लोकशाहीची बालुशाही…

राज्यातील लोकशाहीची बालुशाही केली गेली असे माझे स्पष्ट मत असल्याचे गोटे म्हणाले. बालुशाही प्रमाणे ज्यांच्या वाट्याला जेवढी येईल तेवढा तुकडा खाल्ला जात असल्याची टीका त्यांनी केली.  हा सर्व खेळ काळा पैशाचा आणि बेहिशोबी पैशाचा असून ईडीला हे चित्र दिसत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या सर्व बंडखोर आमदारांसाठी पूर्ण हॉटेलचे हॉटेल आरक्षित केले जात आहेत. विमाने त्यांच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहेत. पैशांचे व्यवहार होण्याची उघड चर्चा होते आहे. अशा परिस्थितीत सीबीआय, इडी आणि आयकर विभाग यांना हे चित्र दिसत नाही का, असा विषय त्यांनी उपस्थित केला आहे. बंडखोर आमदार यांना देखील कायदे लागू होतात. याचा विचार सामान्य जनतेने करावा असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button