Video : अंतराळात ओला टॉवेल पिळल्यावर काय होते? | पुढारी

Video : अंतराळात ओला टॉवेल पिळल्यावर काय होते?

न्यूयॉर्क :  अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये घडणार्‍या गोष्टींचे माणसाला नेहमीच कुतूहल व आकर्षण असते. त्यामुळेच तशा गोष्टींचे काही व्हिडीओ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहत असलेले अंतराळवीर सोशल मीडियात शेअर करीत असतात. आता असाच एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अंतराळात ओला टॉवेल पिळला तर काय होते, हे यामधून दाखवले आहे.

पृथ्वीवर आपण ओला टॉवेल पिळला की, त्यामधील पाणी खाली गळते. मात्र, अंतराळात असा टॉवेल पिळला की, पाणी त्याच्या अवतीभोवतीच फिरत राहते. पाण्याचा एक स्तर टॉवेलभोवती जमा झाल्याचे दिसून येते. ट्विटरवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती हवी होती म्हणून ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने हा व्हिडीओ बनवला होता. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘ओला टॉवेल अंतराळात पिळल्यास काय होते?’ असा प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देण्यासाठी अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्ड यांनी अंतराळ स्थानकावर हा व्हिडीओ शूट केला. त्यामध्ये त्यांनी खिशातून एक नॅपकिन बाहेर काढले व ते पाण्यात भिजवले. त्यानंतर हे नॅपकिन त्यांनी दोन्हीकडून पिळण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्यामधील पाणी इकडे-तिकडे गळून पडण्याऐवजी त्याच्या चारही बाजूंनी साचले. नॅपकिनमधून बुडबुड्यांच्या रूपात बाहेर पडणारे हे पाणी असे आजूबाजूला चिकटून साचत राहिल्याचे व्हिडीओत दिसते. अमेरिकेतील लॉकव्ह्यू हायस्कूलच्या केंद्रा लेमके व मेरेडथी फॉल्कनर या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग डिझाईन केला होता. कॅनेडियन अंतराळ संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हा व्हिडीओ ट्विटरवर येण्याआधी 2013 मध्ये यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता. तो 1 कोटी 97 लाखांपेक्षाही अधिक वेळा पाहिला गेलेला आहे.

Back to top button