नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करूनही ते न पुरवल्याबद्दल दोघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व निवडणूक नायब तहसीलहार राजेश दिवाकर अहिरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मीना सारंगधर व अक्षय सारंगधर यांनी शासनाची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय वखार महामंडळ गोदामात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. या मशीनच्या सुरक्षिततेसाठी 24 तास सुरक्षारक्षक आहेत. त्याचप्रमाणे अलायन्स एन्टरप्रायझेस कंपनीचे सारंगधर यांना सीसीटीव्ही बसवून तेथील फुटेज संकलित करून पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक उपजिल्हाधिकारी स्वाती थविल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्या मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत. याचिकेचा निकाल अद्याप लागलेला नसल्याने व भारत निवडणूक आयोगाची संपत्ती असल्याने ईव्हीएमची सुरक्षितता कमालीची असते. त्यामुळे गोदामातील स्ट्राँगरूम सील करण्यात आली असून, बाहेर 24 तास सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. तर परिसरावर देखरेखीसाठी संशयित सारंगधर यांनी सीसीटीव्ही बसवून त्याचे फुटेज निवडणूक आयोगास देणे बंधनकारक होते.
त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी सारंगधर यांच्याकडे वेळोवेळी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र, संशयितांनी दिली नाही. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या निवडणुकीसंदर्भात असलेले साहित्य सांभाळण्यास त्यांनी दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. त्यामुळे वर्षभरापासून हार्डडिस्क व डाटा मागवूनही तो शासनास दिला नाही. वेळोवेळी पत्रव्यवहार केले, समज दिली तरीदेखील डाटा न दिल्याने सारंगधर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक मतमोजणीदरम्यान दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन दिवसांसाठी हे कॅमेरे बसविण्याचे सांगण्यात आले. परंतु, आजपर्यंत कॅमेरे तेथे लावण्यात आले आहे. वारंवार मला मुदतवाढ देण्यात आली, पण आजपर्यंत या कामाचे वेतन दिले नाही. या विरोधात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. निवडणूक काळात कशा पद्धतीने कोट्यवधींची बिले मंजूर केली याचा भंडाफोड लवकर करणार असून, यासंदर्भातील अधिकार्यांचे फोन कॉल रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे. – अक्षय सारंगधर, अलायन्स एन्टरप्रायजेस