पोलीस आयुक्त पांडे यांची सीबीआयकडून 6 तास चौकशी | पुढारी

पोलीस आयुक्त पांडे यांची सीबीआयकडून 6 तास चौकशी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांची शुक्रवारी 6 तास कसून चौकशी केली. या चौकशीमुळे राज्य आणि केंद्र यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

अनिल देशमुख यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांवरून सीबीआयने प्राथमिक तपास करत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सक्तवसुली
संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुखांसह त्यांच्या दोन्ही सचिवांना अटक केली आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधातही खंडणी वसुली, भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली गुन्हे दाखल होऊ लागले. याविरोधात परमबीर सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. याच दरम्यान, तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांचे एक संभाषण उघड करत परमबीर सिंग यांनी आपल्यावर देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला असल्याचा आरोप केला होता.

सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच प्रकरणात चौकशीसाठी पांडे यांना शुक्रवारी बोलावण्यात आले होते. त्यानुसार पांडे हे सीबीआयसमोर चौकशीला हजर राहिले. त्यांची 6 तास चौकशी करून सीबीआयने जबाब नोंदविला आहे. पांडे यांच्या जबाबानंतर सीबीआय आता पुढे आणखी कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button