कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात दि. 4 ते दि. 6 एप्रिलदरम्यान होत असलेले पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन हे भक्तिमय वैचारिक ठेवा ठरेल. हे संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शनिवारी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष, भारतीय कंपनी लवादाचे सदस्य, न्यायमूर्ती ह. भ. प. डॉ. मदन महाराज गोसावी यांनी डॉ. जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.
डॉ. गोसावी यांनी संमेलनाचा उद्देश सांगितला. संमेलनाचा मुख्य सोहळा, संमेलनात होणारे परिसंवाद, विविध कार्यक्रम, त्याची रूपरेषा आणि त्याची सुरू असलेली तयारी याचीही त्यांनी माहिती दिली.
ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी हे संमेलन म्हणजे भक्ती-संगीताचा महोत्सवच आहे, असे सांगत या संमेलनाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहून तमाम जनतेला मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही डॉ. जाधव यांना केली.
डॉ. जाधव म्हणाले, हे संमेलन म्हणजे संत विचारधारेचा महोत्सवच होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने भक्तिमय वैचारीक ठेवा निर्माण होणार आहे. हे विचार समाजाची गरज आहे. यामुळे हे संमेलन यशस्वी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दै. 'पुढारी' परिवार सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेच. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठीही दै. 'पुढारी'चा पुढाकार राहील, अशी ग्वाहीही डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.
डॉ. गोसावी यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जगन्नाथ पाटील, मोहन गोस्वामी, शिरीष चिटणीस, शाहीर राजू राऊत आदी उपस्थित होते.