अनधिकृत पाणी कनेक्शन : 245 जणांना नोटीस | पुढारी

अनधिकृत पाणी कनेक्शन : 245 जणांना नोटीस

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत पाणी कनेक्शन आढळलेल्या 245 जणांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. अनधिकृत कनेक्शनद्वारे केलेल्या पाणी वापराची पाणीपट्टी रक्कम, दंड, अनामत रक्कम, रस्ता खोदाईची रक्कम आठ दिवसात न भरल्यास पाणी पुरवठा बंद करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने तसे आदेश काढले आहेत.

पाणी बिलातील अपहार समोर आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील पाणी कनेक्शनचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगली व कुपवाडमधील 56 हजार 137, तर मिरजेतील 11 हजार 852 पाणी कनेक्शनचे सर्वेक्षण झाले आहे. त्यातून सांगली व कुपवाडमधील 142, तर मिरजेतील 103 पाणी कनेक्शन अनधिकृत आढळले आहेत. एकूण 245 पाणी कनेक्शन अनधिकृत आढळली आहेत.

कनेक्शन अधिकृत करण्यासाठी..!

अनधिकृत पाणी कनेक्शन जोडणी आढळलेल्या कनेक्शनधारकांकडुन वस्तुस्थितीचा पंचनामा करुन अनधिकृत जोडणीचे कनेक्शन अधिकृत करण्याची कार्यवाही होणार आहे. त्यासाठी ग्राहकाने केलेल्या पाणी वापराची पाणीपट्टीची मिटर रिडींग प्रमाणे अगर किमान आकारणीप्रमाणे यापैकी जास्तीची असणारी रक्कम महापालिकेकडे भरावी लागेल. त्याचबरोबर महासभा ठरावानुसार 3 हजार रुपये दंडात्मक कारवाई, अनामत रक्कम, रस्ता खोदाईची रक्कम महापालिकेला भरावी लागेल. आठ दिवसांच्या मुदतीत रक्कम न भरल्यास संबंधित ग्राहकांचा पाणी पुरवठा पाईप इन्स्पेक्टर विभागाकडुन बंद करुन घेऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

Back to top button