कर्नाटकातील पंपचालकांना मटका : सीमाभागात फटका | पुढारी

कर्नाटकातील पंपचालकांना मटका : सीमाभागात फटका

मिरज : स्वप्निल पाटील
कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात इंधन दरामध्ये मोठी तफावत आहे. परिणामी सीमाभागातील लोकांकडून कर्नाटकातून इंधन आणले जाते. त्याचा फटका जिल्ह्यातील सीमाभागात असणार्‍या पेट्रोलपंप चालकांना बसतो आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात इंधन पुरविणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्रात प्रतिलिटर पेट्रोल 109 रुपये 65 पैसे तर डिझेल 92 रुपये 89 पैसे आहे. कर्नाटकात पेट्रोल 101 रुपये 40 पैसे आणि डिझेल 85 रुपये 83 पैसे आहे. दरामध्ये प्रती लिटर पेट्रोल 8 रुपये 25 पैसे आणि डिझेल 7 रुपये 6 पैसे तफावत आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना कर्नाटकची सीमा जवळ आहे. मिरजेपासून कर्नाटकची हद्द 15 किलोमीटरवर आहे. त्यामुळे मिरज, सांगली शहरासह मिरज पूर्वमधील गावांसह कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात अनेक ग्राहक पेट्रोल, डिझेल कर्नाटकातून आणतात. त्यामुळे सीमाभागातील पंप चालकांना फटका बसला आहे.

पेट्रोलची सर्वाधिक विक्री
पेट्रोलची सर्वाधिक विक्री

 

सांगली मार्केट यार्डात कर्नाटकातून गूळ, हळद, मका, मिरची यांची आवक होते. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रक यांची कर्नाटकात ये-जा असते. या ट्रकचालक कर्नाटकातून येताना ‘टाकी फुल्ल’ करून येतात. महाराष्ट्र सरकारने देखील कर्नाटक सरकारप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करावे, अशी मागणी होत आहे. कारखान्यात डिझेल कर्नाटकातील
सांगली, मिरज शहरातील अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांमध्ये डिझेल कर्नाटकातून आणले जाते.

कोल्हापूर जिल्ह्यातदेखील कर्नाटकातील इंधन

कोल्हापूर जिल्ह्यातील सीमादेखील कर्नाटकलगत आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे सांगली जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सीमाभागातील छोट्या-मोठ्या कारखानदार, शेतकरी, व्यावसायिकांकडून पेट्रोल आणि डिझेलची खरेदी कर्नाटकातूनच होत असल्याचे दिसून येते.

कर्नाटकला जमते, मग महाराष्ट्र सरकारला का नाही?

तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांनीदेखील उत्पादन शुल्क कमी केले होते. इतर राज्यांच्या तुलनेत या दोन राज्यांत सात रुपयांची इंधन दर कमी झाले होते. उत्पादन शुल्क कमी करण्यास कर्नाटक सरकारला जमते परंतु, महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पेट्रोलची सर्वाधिक विक्री

जिल्ह्यातून कर्नाटकातील कागवाड, अथणी, विजापूर या ठिकाणी जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. यामध्ये मोटारसायकल आणि कारची संख्या मोठी आहे. कर्नाटकातून परत येताना या वाहनधारकांकडून पेट्रोल मोठ्या प्रमाणात आणले जात आहे. प्रती लिटर 8 रुपये 40 पैशांचा फरक असल्याने मिरज तालुक्यातील अनेकजण केवळ पेट्रोलसाठी सीमाभागात जातात.

Back to top button